आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहमंत्री होऊनही शेवटपर्यंत आबा राहिलेले आर. आर. पाटील; तीच होती त्यांची खरी ओळख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा सत्तापदांचा प्रवास करुनही आबा शेवटपर्यंत आबाच राहिले. - Divya Marathi
आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा सत्तापदांचा प्रवास करुनही आबा शेवटपर्यंत आबाच राहिले.
मुंबई/सांगली- रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर. आर. पाटील आज त्यांचा जन्मदिन... लोक प्रेमाने त्यांना आबा म्हणत..  तीच होती त्यांची खरी ओळख. आबा अखेरपर्यंत आबाच राहिले त्यांनी आपला आबासाहेब होऊ दिला नाही हेच त्याचं वेगळेपण. जिल्हा परिषद सदस्य, सहा वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा सत्तापदांचा प्रवास करुनही आबा शेवटपर्यंत आबाच राहिले.
 
16 ऑगस्ट 1957 ला सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी गावात जन्मलेल्या आर आर पाटलांनी कमवा आणि शिका हा मंत्र जपत श्रमदान करत शिक्षण घेतले. शाळकरी वयातच प्राचार्य पी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन आबांना मिळाले. पुढे सांगलीतल्याच शांतीनिकेतन महाविद्यालयातून ते बीए झाले. पुढे एलएलबीही झाले.
 
गरिब शेतकरी कुटुंबातल्या या होतकरु तरुणाचे नेतृत्वगुण सुरवातीला हेरले ते वसंतदादा पाटलांनी. कोणतीही राजकीय पाश्वभुमी नसतांनाही मनाला भिडणारी भाषणशैली, स्वच्छ प्रतिमा आणि समाजासाठी काही करण्याची जिद्द यांच्या जोरावर आबा पाटलांनी राजकारणात वाटचाल सुरु केली. वसंतदादांबरोबरच यशवंतराव चव्हाण यांचीही प्रेरणा आर. आर. पाटील यांना होती. आर. आर. पाटील हे पहिल्यांदा 1979 साली सावळज मधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले.
 
1979 ते 1990 पर्यंत ते जिल्हा परिषद सदस्य होते. मग 1990 ते 2014 या काळात ते सतत विधानसभेवर निवडून आले. तासगाव मतदार संघातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आबा 1990 साली पहिल्यांदा विधान सभेवर निवडून आले. आर. आर. पाटील हे 1995 साली कॉंग्रेसच्या तिकिटावर दुसऱ्यांदा आमदार झाले. तेव्हा भाजप-शिवसेनेचे युती सरकार सत्तेत होते. राजकीय आयुधांचा वापर करत आबांनी त्यावेळी विधानसभा दणादून सोडली आणि सत्ताधारी भाजप-शिवसेनेला कोंडीत पकडले.
 
अभ्यासू आणि स्वच्छ आमदार अशी सार्थ ओळख आबांनी निर्माण केली होती. नंतर शरद पवारांसोबत आबांनी काँग्रेस सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तो 1999 च्या सुमारास. याच काळात शरद पवार यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक अशी आर. आर. पाटील यांची ओळख निर्माण झाली. आबांनी 2004, 2009 आणि 2014 ची आमदारकीची निवडणुक अटीतटीने लढत जिंकली. सुरवातीला तासगाव आणि नंतर कवठेमहांकाळ मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. आमदारकीबरोबरच त्यांची मंत्रीपदाची कारकिर्दही गाजली. 
 
आर. आर. पाटील  यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये सुरवातीला ग्रामविकास मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. गाडगे महाराज स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून आर आर पाटील यांनी वेगळी ओळख निर्माण केली. पुढे राज्याचं गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदही त्यांनी जबाबदारीने सांभाळले.  मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्या काही वक्तव्यांनी वाद झाले आणि आबांना गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदही सोडावे लागले. पण आबांची स्वच्छ प्रतिमा कायम राहिली. गृहमंत्री असतांना डान्सबार बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन आबांनी अनेक संसार सावरले. डान्स बार बंद करण्याच्या निर्णयाला विरोधही झाला पण आबा ठाम राहिले. 
 
गृहमंत्रीपदाच्या काळात त्यांनी राबवलेले महात्मा गांधी तंटामुक्त अभियानही अभिनव होते. गाडगेबाबा, महात्मा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून प्रेरणा घेत गरीब शेतकरी कुटुंबातले आर. आर. पाटील सत्तेच्या राजकारणात राहुनही साधेच राहिले. साधेपणा हेच त्याचं वैशिष्ठय होते. याच साधेपणातून ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत. सत्ता येते आणि जाते पण सोबत राहतात ती जोडलेली माणसे हे आर. आर. पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे सांभाळली. कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष वाढवला.
 
आबा सत्तेची एक एक पायरी चढत गेले पण कुटुंबाने आबांप्रमाणेच आपला साधेपणा टिकवून ठेवला. पत्नी सुमन, मुलगा रोहित आणि मुलगी स्मिता, आई भागिरथी यांनी वागण्याबोलण्यात सत्तेचा दर्प येऊ दिला नाही. आबांचे एक भाऊ सुरेश हे गावाकडे शेती बघतात. तर दुसरे भाऊ राजाराम पोलिस दलात आहेत. आबा गृहमंत्री असतांना आबांचे भाऊ राजाराम पाटील पोलिस दलात कुठलाही बडेजाव न करता सेवा बजावत होते. समाजासाठी अजून खूप काही करण्यापुर्वीच मृत्यूनं आर. आर. पाटील यांना गाठलं आणि महाराष्ट्रातील एका चांगल्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला.
बातम्या आणखी आहेत...