आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RR Patil State Officials Donate Salaries For Drought Relief

दुष्काळ निधीसाठी आबा सरसावले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी मंत्री आणि आमदार, खासदारांनी आपला एक महिन्याचा पगार द्यावा, असे मंत्रिमंडळाच्या बैठकीत आग्रहीपणे मांडणार्‍या गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी स्वत:च एक महिन्याचा पगार दिला. तसेच राज्यातील कामगार संघटना, उद्योगपती आणि सर्वसामान्यांनीही सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून दुष्काळग्रस्तांसाठी मदत करावी, असे आवाहनही पाटील यांनी केले.

राज्यातील दुष्काळग्रस्तांना दिली जाणारी सरकारी मदत पुरेशी नाही असे आपले म्हणणे अजिबात नाही. मात्र या कठीण प्रसंगी सर्वांनीच मदत केली पाहिजे ही आपली भूमिका असून ती आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मांडली होती. त्यानुसार आपला एक महिन्याचा पगार 57 हजार रुपये मुख्यमंत्र्यांच्या निधीत जमा केला असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील अन्य मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी याप्रमाणे आपला पगार दिल्यास दुष्काळग्रस्तांसाठी चांगली रक्कम होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिक्षकही देणार एक दिवसाचे वेतन - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनीही राज्यातील 2.65 लाख शिक्षक एक दिवसाचा पगार देणार असल्याची घोषणा केली. सिनेक्षेत्रातील काही मंडळीही मदतीला पुढे आल्याचे आबांनी सांगितले. 1972 मध्ये मफतलाल या उद्योगपतींनी राज्यातील रोहयो मजुरांना तीन महिने सुकडी पुरवली होती. त्याचप्रमाणे उद्योगपतींनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहनही गृहमंत्र्यांनी केले.