आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RSP Chief Mahadev Jankar Was Bitten By Stray Dogs While Trying To Protect A Citizen From The Animals.

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना भटका कुत्रा चावला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना गोरेगाव येथे गुरुवारी रात्री घडली. नागरी निवारा प्रकल्प परिसरात गुरुवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली. एका वृद्धाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी जानकर घराखाली धावले. तेव्हा कुत्र्यांनी त्यांचाच चावा घेतला. कांदिवलीच्या आस्था रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुंबई आणि ठाण्यात कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ले करण्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत. ठाण्यात गुरुवारी एकाच दिवशी तब्बल 15 जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला. त्यामुळे मुंबई-ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढल्याचे आकडेवारी सांगत आहे. गेल्या महिनाभरात 1300 लोकांचे कुत्र्यांनी लचके तोडले आहेत.
गेल्या रविवारी पनवेलमधील खुटारी गावात चार मोकाट कुत्र्यांनी पाच वर्षांच्या प्रतीक्षा शारू या मुलीचे लचके तोडल्याने तिचा मृत्यू झाला होता. 26 मार्च रोजी हमदान खान या साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याचे सहा मोकाट कुत्र्यांनी लचके तोडले होते. गेल्या जानेवारी महिन्यात वाशीच्या जुहू गावात पिसाळलेल्या कुत्र्याने 16 जणांचा चावा घेतला होता. त्यात 5 पुरुष, 1 महिला, 4 मुली आणि 6 लहान मुलांचा समावेश होता.
दरम्यान, सरकारी व खासगी रूग्णालयात रेबिजची लस उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या जिवाला धोका कायम आहे. महादेव जानकर यांना कुत्रा चावल्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतरही त्यांच्यासाठी लस उपलब्ध झाली नाही. आमच्या सरकारने सर्व रूग्णालयात रेबिजची लस उपलब्ध करून दिली पाहिजे यासाठी मी पाठपुरावा करणार असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले.