आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप आमदार, खासदारांचे खासगी सचिव संघ घडवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नरेंद्र मोदींचे सरकार केंद्रात सत्तेत आल्यानंतर भाजप लोकप्रतिनिधींच्या बौद्धिक प्रबोधनाला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी खासदारांचे वर्ग घेण्यात आले होते. आता पुढचे पाऊल म्हणजे खासदार तसेच आमदारांचे खासगी सचिवही घडवले जाणार आहेत आणि त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील एक भाग असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने पुढाकार घेतला आहे.

प्रबोधिनीत 19 ते 24 ऑगस्टदरम्यान हे प्रमाणपत्र वर्ग घेतले जाणार असून त्यासाठी 5 हजार रुपये फीसुद्धा आकारली जाणार आहे. आतापर्यंत 15-20 जणांचे अर्ज आले आहेत. यापैकी बहुसंख्य अर्ज हे संघाचे विचार मानणार्‍यांचे असल्याचे समजते. मात्र हा वर्ग सर्व पक्षांच्या विचारसरणीच्या लोकांना खुला आहे. त्यात संघ आणि इतर पक्ष असा भेदभाव नाही, असे म्हाळगी प्रबोधिनीचे प्रमुख विनय सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केले.

सहस्रबुद्धे म्हणाले, खासगी सचिवांचे प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. बहुसंख्य खासदार तसेच आमदार हे सचिवांवर अवलंबून असतात. सचिव सक्षम असला तर लोकप्रतिनिधींना त्याचा फायदा होतो. मात्र तसे नसेल तर फटकाही बसू शकतो. सचिव किमान पदवीधर व संगणक प्रशिक्षित असावा, अशी अपेक्षा आहे. याआधी म्हाळगी प्रबोधिनीतर्फे आमदार तसेच खासदारांचे प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्यात भाजपसह शिवसेना, शेकाप तसेच राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींचा समावेश होता. संसद, विधिमंडळ, जिल्हा परिषद सदस्यांना अभ्यासूपणे विषय कसे मांडायचे याचे प्रशिक्षण दिले होते. त्याचा पुढचा भाग म्हणजे सचिव घडवण्याचे प्रशिक्षण आहे.

काय देणार प्रशिक्षण?
बेसिक व्यवस्थापन कौशल्य, वेळ आणि दिवसांचे व्यवस्थापन, कार्यक्रम व्यवस्थापन, माध्यमांशी संवाद, सोशल मीडिया, इंग्रजी संवाद, संगणक कौशल्य अशा अभ्यासाचा म्हाळगी वर्गामध्ये समावेश राहणार आहे. यात राज्यशास्त्र तसेच व्यवस्थापन शास्त्राचे प्राध्यापक मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय याआधी केंद्रीय मंत्री तसेच अनुभवी खासदारांबरोबर काम केलेल्या खासगी सचिवांनाही वर्ग घेण्यासाठी बोलावले जाणार आहे. लोकप्रतिनिधींपेक्षा स्वत:ला मोठे समजून आपल्या पातळीवर कामे रेटू पाहणार्‍या खासगी सचिवांचे नक्की काम काय, याचे मार्गदर्शन या वर्गात मिळेल. मुख्य म्हणजे यामुळे लोकोपयोगी कामांना चालना मिळेल, असे सहस्रबुद्धे म्हणाले.

मणिपाल विद्यापीठात अभ्यासाचा समावेश
सचिव प्रशिक्षणाच्या या 10 दिवसांच्या अभ्यासक्रमाचा विद्यापीठाच्या शिक्षणात समावेश व्हावा, अशी म्हाळगी प्रबोधिनीची इच्छा होती. त्यासाठी देशातील काही विद्यापीठाशी आम्ही संपर्क साधला आणि त्यापैकी मणिपाल विद्यापीठाने या अभ्यासक्रमासाठी निवड केली आहे.