आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रा.स्व. संघ भाजपचा प्रचारक; स्वयंसेवक जाणार घराेघर !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय जनता पक्षाचे मूळ असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राजकारणाशी आपला कसलाही संबंध नसल्याचे आणि भाजपच्या कार्यप्रणालीवर नियंत्रण नसल्याचे वारंवार सांगितले असले तरी राज्यात भाजपची मुळे रुजावीत म्हणून संघाने आता कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचावे आणि जनतेची कामे व्हावीत म्हणून संघ प्रचारक काम करणार असून तशी योजना तयार करण्यात आल्याची माहिती भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

स्वयंसेवकाची फळी सज्ज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्यामुळे राज्यात भाजपची सत्ता आली. मात्र पहिल्या दीड वर्षातच विविध मंत्र्यांवर आरोप झाल्याने जनतेच्या मनातून हे सरकार उतरत असल्याचे चित्र दिसू लागले. लोकोपयोगी कामे करूनही ती जनतेपर्यंत न पोहोचता भ्रष्टाचाराचे मुद्दे आक्रमकपणे पोहोचवले जात आहेत. हे लक्षात घेऊन आता संघ आक्रमक झाला आहे. यासाठी स्वयंसेवकांची एक फळी तयार करण्यात आली आहे. आसाममध्ये स्वयंसेवकांनी भाजप घराघरात पोहोचवला त्याच धर्तीवर आता राज्यातील प्रत्येक घरात भाजप पोहोचवण्यासाठी प्रत्येक तालुक्याची जबाबदारी एका वरिष्ठ स्वयंसेवकावर देण्यात आली आहे. अशा प्रकारे भाजपची कामे जनतेपर्यंत पोहोचवून २०१९ च्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु केली जाणार आहे.

योजनांतील समस्या शोधणार
निवडण्यात आलेले स्वयंसेवक तालुक्यातील गावांमध्ये राज्य सरकारच्या योजना पूर्ण करण्यावर भर देणार आहेत. या योजनांमध्ये कोणत्या समस्या आहेत, त्या का पूर्ण होत नाहीत याची माहिती घेऊन ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल. त्यानंतर या योजना तातडीने पूर्ण करण्यास सांगितले जाईल.

नवी त्रिसूत्री
माझा गाव, माझा तरुण आणि माझा पैसा या त्रिसूत्रीअंतर्गत स्वयंसेवक काम करणार आहेत. गावातील तरुणांना गावातच रोजगार मिळावा ज्यामुळे त्यांना शहराकडे जावे लागू नये आणि गावातच पैसा खेळता राहावा अशी योजना आखण्यात आली आहे.

मुंबईत प्रशिक्षण
जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत स्वयंसेवकांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असून यात मोबाइल अॅप लाँच केले जाईल. एकूणच शतप्रतिशत भाजपचा नारा खरा करण्यासाठी अखेर संघालाच धाव घ्यावी लागली असल्याचे चित्र यातून दिसत आहे.

खास मोबाइल अॅप
या संपूर्ण प्रक्रियेसाठी आणि प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात राहावा यासाठी एका विशेष मोबाइल अॅपची निर्मिती करण्यात आली असून या योजनेत समाविष्ट असलेल्यांनाच हे अॅप वापरता येणार आहे. यासाठी विशिष्ट पासवर्ड असेल. या अॅपवर मुख्यमंत्री फडणवीस यांचा ३० सेकंदांचा एक व्हिडिअोही अपलोड करण्यात आला आहे.

पुढे वाचा, अस्वस्थ मातंग समाजाला सबुरीचा सल्ला...
बातम्या आणखी आहेत...