आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ruling Government Interfere In Voting List, BJP Registered Complaint To Election Comission

मतदार याद्यांत सत्ताधा-यांचा हस्तक्षेप,निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ज्या बुथवर भाजप-शिवसेना उमेदवारांना मताधिक्य मिळाले, त्या बुथवरील हजारो मतदारांची नावे यादीतून वगळयात आल्याची तक्रार मुंबई भाजपाने शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाकडे केली. संबंधित मतदार याद्यांची फेरतपासणी करण्यात येईल, असे आश्वासन निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी भाजप शिष्टमंडळाला दिले.


मुलूंड, घाटकोपर, वांद्रे या मतदारसंघात भाजपला गेल्या वर्षी मताधिक्य मिळाले होते. त्या मतदार संघातील 9 हजार मतदारांची नावे वगळली आहेत, तर कांदीवली, मानखुर्द मतदारसंघात काँगे्रसला मताधिक्य मिळाले होते. त्या मतदारसंघात या वेळी 20 हजार मतदारांची भर पडल्याची तक्रार भाजपची आहे. मुंबईतील मतदार याद्यांमधील बदल जाणीवपूर्वक करण्यात आले आहेत. यात राजकीय हस्तक्षेप झाला असून, सर्व याद्यांचे फेर सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच निवडणूक यांद्याची श्वेतपत्रिका काढण्यात यावी, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने केली. जे मतदार स्थलांतरीत झाले, मयत अथवा दुबार आहेत, त्यांची नावे वगळण्याची मोहिम राबवण्यात आली होती. सत्ताधा-यांनी संधी साधून विरोधकांच्या मतदारसंघातील हयात मतदारांची नावे गायब केली, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. वांद्रे -पश्चिम मतदार संघात गेल्या वेळी भाजपाला मताधिक्य मिळाले होते. तेथील 67 बुथमधून प्रत्येकी 50 पेक्षा जास्त नावे वगळण्यात आली, तर काँग्रेसला मताधिक्य मिळालेल्या 20 बूथवरील एकही नाव वगळले नाही, असे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार म्हणाले.


ज्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत, ते मतदार सध्या त्याच पत्त्यावर वास्तव्यास आहेत. मतदारांचे सर्वेक्षण करणारे बीएलओ यांना हाताशी धरून सत्ताधारी पक्षांनी मतदार याद्यांमध्ये हस्तक्षेप केला आहे. या बेकायदा बदलाची चौकशी करण्यात यावी. तसेच मुंबईतील सर्व मतदार याद्यांची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी भाजपने केली आहे.


अधिका-यांची चौकशी करा
सत्ताधा-यांशी संगनमत करून मतदारांची नावे काढून टाकत सत्ताधारी पक्षाला मदत करणा-या बीएलओंची चौकशी व्हावी, अशी मागणी सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केली.


आयोगाने घेतली दखल
18 ते 31 ऑक्टोबरदरम्यान मुंबईत विशेष मोहीम राबवली जाईल. त्यात गहाळ मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यात येतील, असे आश्वासन निवडणूक आयोगाने दिल्याची माहिती शेलार यांनी पत्रकारांना दिली.