आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra NCP Leader RR Patil Passes Away News In Marathi

राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील यांचे निधन, आबांचे पार्थिव राष्ट्रवादीच्या कार्यालयात दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (रावसाहेब रामराव पाटील) यांचे आज (सोमवारी) निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी अंतिम श्वास घेतला. गेल्या तीन महिन्यांपासून आर. आर. आबांची कर्करोगाशी झुंज सुरु होती. अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

हेही वाचाः लोक मला प्रेमाने 'आबा' म्हणतात, आर.आर.पाटीलांचा Blog जसाच्या तसा!

आर. आर. आबांचे पार्थिव मुंबईतील राष्‍ट्रवादी भवनात दाखल झाले असून ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. पार्थिव रात्री दहा वाजेपर्यंत राष्ट्रवादी भवनातच ठेवण्यात येईल. त्यानंतर सांगलीला रवाना होणार होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यांच्या निधनामुळे एका दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारी (17 फेब्रुवारी) दुपारी 12 वाजता त्यांच्या पार्थिवावर सांगली जिल्ह्यांतील तासगाव येथे शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्‍यात येणार आहेत.
जिल्हा परिषद सदस्य ते महाराष्ट्राचे गृहमंत्री अशी आबांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द आहे. उत्तम वक्ते आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून आर. आर. आबांची जनमानसात ओळख होती. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी सामर्थ्याने पेलली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाने पीडित होते. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. आबांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्‍ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी आर. आर.पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली होती. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. आबांच्या प्रकृती संदर्भात सोमवारी पुन्हा काही अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर अनेक नेत्यांनी थेट लीलावती हॉस्पिटल गाठले होते. परंतू आबांची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत होते. अखेर आबांची निधन झाल्याचे पाच वाजता जाहीर करण्‍यात आले.

आर.आर.पाटील यांचा जीवनपट...
जिल्हा परिषदेचे सदस्य ते राज्याचे उपमुख्यमंत्री हा आबांचा प्रवास थक्क करणार होता. आबांचा जन्म 16 ऑगस्ट 1957 रोजी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी येथे झाला होता. सांगलीच्या शांतीनिकेतन कॉलेजमध्ये आबांनी बी.ए. आणि एल.एल.बीचे शिक्षण केले. वयाच्या 22 व्या वर्षी सावळज गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेले. 1979-99 पर्यंत जिल्हा परिषदेतील विविध पदांवर काम केले. 1990 पासून सलग सहा वेळा तासगावमधून विधानसभेवर निवडून गेले. 1999 ला आर.आर. पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
हेही वाचाः 'बडे बडे शहरो में छोटी छोटी बातें होती रहती हैं...', आबांच्‍या या विधानाने माजली होती खळबळ

1999 ते 2004 पर्यंत ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामुळे आबा घराघरात पोहोचले होते. 2004 ला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ आणि गृहखात्याची जबाबदारी आबांनी यशस्वीपणे पेलली होती. गृहमंत्री असताना गावतंटे टाळण्यासाठी राज्यभर तंटामुक्त गाव अभियान राबवले.
नेत्याच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे...
आबांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी- अशोक चव्हाण
सभागृहात उत्तमपणे काम करणारे सहकारी म्हणजे आर. आर. पाटील. सामान्य माणूस ते राजकीय नेता हा प्रवास प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
एका आदर्श सरपंच हरपला- अण्णा हजारे
एका आदर्श सरपंच हरपला, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे. आर.आर. पाटील यांनी ग्राम स्वच्छतेसाठी मोठे योगदान दिल्याचेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
सच्चा सहकारी गेला- शरद पवार
आबांचा राजकीय प्रवास थक्क करणारा होता. आबांनी अनेक संकटे पचवली होती. आबांच्या नेतृत्वाची मला खूप मदत झाल्याचे राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. एक सच्चा सहकार गमावला, अशा शब्दांत शरद पावारांनी दु:ख व्यक्त केले.

राष्ट्रवादीचा आधार होते- छगन भुजबळ
आर.आर. अतिशय छोट्या कुटुंबातून आलेले व्यक्तीमत्त्व होते. गेल्या तीन महिन्यांपासून ते कर्करोगाशी झुंज करत होते. डॉक्टरांचे प्रयत्न सुरु होते. अखेर आबांची प्राणज्योत मालवली. आर.आर आबा हे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आधार होते, प्रतिक्रिया राष्ट्रवादी पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी दिली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, आर. आर. आबांचे PHOTO