आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; जागतिक घडामोडींमुळे सोने 25 हजारांकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नवी दिल्ली/औरंगाबाद - काही दिवसांपूर्वी तेजीच्या वारूवर स्वार असलेले सोने गेल्या तीन दिवसांत 2000 ते 2500 रुपयांनी स्वस्त झाले आहे. जागतिक घडामोडींनी या मौल्यवान धातूचा तेजीचा रथ रोखला. दोन महिन्यांपूर्वी तोळ्यामागे 30 ते 31 हजारांच्या कक्षेत फिरणारे सोने शुक्रवारी 25,650 रुपयांपर्यंत खाली आले. सोन्याचा हा 23 महिन्यांचा नीचांक आहे. औरंगाबादेत सोने 900 रुपयांनी स्वस्त होऊन 25,700 वर आले.

अमेरिकी फेडरल रिझर्व्हने रोखे खरेदीचा हात आखडता घेण्याचे दिलेले संकेत आणि केंद्राच्या सोन्यावरील निर्बंधांमुळे मागणी घटली. शुक्रवारी दिल्लीत सोन्याची प्रचंड विक्री झाली. गुंतवणूकदार शेअर्सकडे वळल्याने सोन्याला फटका बसत आहे. जागतिक बाजारात सोन्याने 3 वर्षांचा नीचांक गाठला. सिंगापूरमध्ये सोने औंसमागे (28.35 ग्रॅम) 24.40 डॉलरनी घसरून 1200.80 वर आले.


सोन्यातील घसरण कशामुळे
सरकारी बंधने : सोने आयातीवर सरकारने अनेक बंधने घातली. रिलायन्स मनीने पोस्ट ऑफिसमार्फत होणारी सोने विक्री बंद केली. एचडीएफसीने क्रेडिट कार्डद्वारे सोने खरेदीवर बंदी आणली आहे.

चीन फॅक्टर : गोल्डमॅन सॅक्सने चीनचा विकास दर कमी राहण्याचा अंदाज वर्तवला. त्यानंतर बेस मेटल्समध्ये गतीने घसरण झाली. त्याचा परिणाम सोन्यावर झाला.

फेडरल रिझर्व्ह : फेडरल रिझर्व्हने आर्थिक मदत परत घेण्याचे संकेत दिले. बाजारात मंदी येण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदार सोन्याची विक्री करताहेत.

टप्प्याटप्प्याने खरेदी
सोने आणखी घसरण्याची शक्यता आहे. सध्याचा कल पाहता 23,500 पर्यंत सोने येऊ शकते. ग्राहकांनी एकदम खरेदी टाळून ‘बाय ऑन डीप’ नुसार खरेदी करावी.
विश्वनाथ बोदाडे, वरिष्ठ व्यवस्थापक, आनंद राठी ब्रोकर्स.

एकदम खरेदी टाळावी
सोन्याच्या किमतीत सध्या खूप चढ-उतार होत आहेत. एखाद्याला पाच तोळे सोने घ्यायचे असेल तर ते एकदम न घेता. चढ-उताराचा कल पाहून खरेदी करावी.
दत्ता सावंत, उपाध्यक्ष, सराफ संघटना


सेन्सेक्स 19 हजारावर

एका दिवसात 2.75 टक्के वाढ
गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूक शेअर्सकडे वळवल्याने, सेन्सेक्सने दीड वर्षाचा उच्चांक गाठला. निर्देशांकाने 519.8 अंकांच्या कमाईसह 19,391.85 पातळी गाठली. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 29 समभाग तेजीत राहिले.

रुपयाकडून डॉलरची धुलाई :
डॉलरच्या तुलनेत साठी पार केलेल्या रुपयाने शुक्रवारी डॉलरची यथेच्छ धुलाई केली. रुपयाने 80 पैशांच्या कमाईसह 59.39 पातळी राखण्यात यश मिळवले. विदेशी गुंतवणूकदारांच्या खरेदीने रुपयाला बळ मिळाले.

सोने 21,500?
रॉबिन या गुंतवणूक सल्लागार फर्मच्या मते, जागतिक बाजारपेठेत दोन वर्षात सोने प्रतिऔंस 1000 डॉलरची पातळी गाठण्याची शक्यता आहे. असे झाले तर भारतीय बाजारात सोन्याची किंमत तोळ्यामागे 21,500 रुपये होईल.