आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण भागात चार वर्षांत घरोघरी शौचालय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून येत्या चार वर्षांत ग्रामीण भागात घर तेथे शौचालय बांधण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने आखली आहे. मोहिमेचा प्रसार करण्यासाठी तालुका पातळीवर सॅनिटरी पार्क उभारण्यात येणार असून या मोहिमेसाठी सुमारे दोन हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

स्वच्छता मोहिमेअंतर्गत गावांत शौचालये उभारण्यासाठी सरकारने विविध योजना आखल्या आहेत. जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांची नेमणूक केली आहे. राज्य पातळीवर प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासह नऊ स्वच्छता दूत नेमण्यात आले आहेत. मकरंदने यासाठी एक रुपयाही मानधन घेतलेले नाही.

ग्रामीण जनतेला शौचालयांची माहिती व्हावी म्हणून तालुक्याच्या ठिकाणी सॅनिटरी पार्क असेल. या ठिकाणी शौचालयांचे विविध नमुने उभारण्यात येतील. ग्रामपंचायतींना ते पाहून त्यातील एका पद्धतीच्या शौचालयाची निवड करता येईल. गावांत शौचालयांचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिकांना प्रोत्साहन देण्यात येईल. हे साहित्यही एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले जाईल.

गावांत स्वच्छता दूत, १५० रुपये मानधन
ग्रामीण भागातील लोकांना शौचालय वापरासाठी प्रेरित करण्याच्या कामी गाव पातळीवरही सरकारच्या वतीने स्वच्छता दूत नेमण्यात येणार आहेत. त्यात ५० टक्के महिलांची नियुक्ती असणार आहे.प्रति शौचालय या दूतांना १५० रुपये मानधन देण्यात येणार आहे.

केंद्राकडून मिळणार १५०० कोटींचा निधी
योजनेसाठी राज्याने यंदा ४५५ कोटींची तरतूद केली आहे. गेल्या वर्षी ती १०८ कोटी होती. शिवाय केंद्राकडूनही यंदा १५०० कोटी रुपये मिळणार आहेत. शौचालयांचे सर्वेक्षण सुरू झाले असून केंद्राकडून वेगळा निधी मागवला जाईल. - बबनराव लोणीकर, स्वच्छतामंत्री, महाराष्ट्र

घरामागे १२ हजार निधी, मनपातही सर्वेक्षण सुरू
प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी देण्यात येणारी ४ हजारांची रक्कम वाढवून १२ हजार करण्यात आली आहे. नगरपालिका, मनपा क्षेत्रांतही शौचालय सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यासाठी ३०० कोटी तरतूद आहे.