आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यंगचित्रकार प्रभुदेसाईंकडून दिलगिरी, म्हणाले- भावना दुखावण्याचा हेतू नव्हता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय राऊत यांनी मंगळवारी केलेली फेसबुक पोस्ट - Divya Marathi
संजय राऊत यांनी मंगळवारी केलेली फेसबुक पोस्ट
मुंबई - ‘सामना’च्या ‘उत्सव’ पुरवणीतील माझ्या एका व्यंगचित्राने सध्या काहूर माजले आहे. विशेषत: मराठा समाजाच्या भावना व्यंगचित्रामुळे दुखावल्या व त्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू कधीच नव्हता. तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असा खुलासा व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी केला आहे.

बुधवारी 'सामना'मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, व्यंगचित्राचा वाद अकारण आहे. मी एक कलावंत असलो तरी राजकीय व्यंगचित्रकार नाही. धकाधकीच्या जीवनात लोकांना दोन विरंगुळ्याचे क्षण मिळावेत म्हणून व्यंगचित्रे काढतो व त्या सदराचे नाव म्हणूनच ‘हसोबा प्रसन्न’ आहे, असे स्पष्टीकरण प्रभुदेशाईंनी दिले आहे.
व्यंगचित्राच्या वादाचे मुंडे-विखे राजकारण करताहेत
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चामध्ये फडकणारे भगवे झेंडे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे यांना बघवत नाहीत. ‘सामना’तील व्यंगचित्राचा वाद मिटला असताना तो चिघळवण्याचा प्रयत्न ते करीत आहेत, असा आरोप शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
‘मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यंगचित्राचा वाद पेटविणाऱ्या समाजकंटकांचा पर्दाफाश केल्यानंतर निवळलेले वातावरण पुन्हा पेटवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे करीत आहेत. खरे तर मराठा समाजास रस्त्यावर उतरण्यास भाग पाडणारे दुसरे तिसरे कोणी नसून काँग्रेस व राष्ट्रवादी आहेत,’ असेही देसाई यांनी नमूद केले अाहे. मराठा आंदोलनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्णपणे पाठिंबा दर्शवून आयोजकांना संपूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना शिवसैनिकांना दिल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, ‘सामना’त आलेल्या व्यंगचित्रामुळे शिवसेना आमदारांमध्ये नाराजी असून ती दूर करण्याचा प्रयत्न देसाई करीत असल्याचे या नाराज नेत्यांचे म्हणणे आहे.
बातम्या आणखी आहेत...