आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar, Rekha Spent Nothing From MP Development Fund News In Marathi

निधीवाटपात सचिन शून्यावर बाद; खासदार फंडातील एक पैसाही खर्च केला नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारताचा महान क्रिकेपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर याचा मैदानावर धावांचा पाऊस पाडण्यात हातखंडा असला तरी खासदार फंडाचा वापर करण्यात मात्र तो सपशेल अपयशी ठरला आहे.

2012 मध्ये राज्यसभेवर वर्णी लागलेल्या सचिनला खासदार फंडातून दरवर्षी विकासासाठी पाच कोटींचा निधी प्राप्त झाला. आर्थिक वर्ष संपण्याच्या आत हा निधी खर्च करायचा असतो. तत्पूर्वी त्या निधीच्या वापरासाठी राज्यसभा सदस्याने एक जिल्हा निवडायचा असतो. सचिन सध्या मुंबईचे उपनगर असलेल्या वांद्रय़ात राहतो. खासदार निधीच्या वापरासाठी त्याने मुंबई उपनगर जिल्हय़ाची निवड केली आहे. परंतु 2012-13 मध्ये त्याने निवडलेल्या जिल्हय़ात विकासाचे एकही काम तो सुचवू शकला नाही.

रेखाला जिल्हाच नाही, अनु आगा यांनी मारली ‘सेंच्युरी’
सचिनबरोबर अभिनेत्री रेखा आणि उद्योजिका अनु आगा यांची राज्यसभेवर वर्णी लागली होती. रेखाने खासदार निधीच्या वापरासाठी अद्याप जिल्हय़ाची निवडच केलेली नाही, तर अनु आगा यांनी मात्र त्या राहत असलेल्या पुणे जिल्हय़ाच्या विकास कामांवर साडेतीन कोटी खर्च करत ‘सेंच्युरी’ ठोकली आहे. मध्यंतरी औरंगाबाद जिल्ह्यातील एका गावाच्या रस्त्यासाठी सचिनने खासदार फंडातून निधी दिल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. परंतु आजपर्यंतच्या खासदार सचिन यांनी त्यांच्या दहा कोटीच्या खासदार फंडामधून एकाही विकास कामाची शिफारस केलेली नाही, असे राज्यसभेचे संकेतस्थळ सांगत आहे.

वायफळ खर्च
खासदार बनल्यानंतर सचिनने दिल्लीच्या संसद परिसरातील ऐसपैस शासकीय बंगला नाकारला होता. ‘सरकारचा वायफळ खर्च नको’ म्हणून घर नाकारल्याचे त्याने म्हटले होते. खासदार निधीही कदाचित सचिनला वायफळ वाटत असावा, त्यामुळे त्याने कोणतेही काम सुचवलेले नाही, असे मानण्यास जागा आहे.

निमित्त सापडले नाही
सचिन राहत असलेल्या मुंबईच्या पश्चिम उपनगरांत सर्वाधिक झोपडपट्टय़ा आहेत. पायाभूत विकासाचे अनेक प्रश्न या परिसरात आहेत. परंतु सचिनला मात्र दहा कोटी खर्च करण्याला अद्याप निमित्त सापडू नये, हे विशेष.

एकही प्रश्न नाही
विशेष म्हणजे सचिनने राज्यसभेमध्ये अद्याप एकही प्रश्न विचारलेला नाही. त्याप्रमाणेच दीड वर्षात खासदार निधीचा वापरही तो करू शकलेला नाही. त्यामुळे त्याने निवडलेल्या मुंबई उपनगर जिल्हय़ातील काही विकासकामे मार्गी लागू शकली नाहीत. क्रिकेटपटू म्हणून विक्रमांचे विक्रम रचणारा मास्टर ब्लास्टर सचिन खासदारकीत मात्र अगदी शून्यावर बाद झाला आहे.