आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे रूळ ओलांडताना मी लहानपणी वाचलो, तुम्ही रूळ ओलांडू नका- सचिन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लहानपणी एकदा रेल्वे रूळ ओलांडताना मी वाचलो होतो. आपल्यावर तो प्रसंग बेतला होता. रेल्वे टपावर बसून केलेला प्रवास जीवावर बेतू शकतो. तुम्ही असा जीव धोक्यात घालून धोकादायक प्रवास करू नका, असे आवाहन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केले आहे.
मुंबईतील जीआरपीमधील वाडी बंदर येथील मुख्यालयात रेल्वे पोलिसांनी आयोजित केलेल्या‘समिप’आणि ‘बी-सेफ’ या कार्यक्रमात सचिन सहभागी झाला होता. मुंबई रेल्वे पोलिसांच्या वतीने रेल्वे प्रवाशांसाठी सुविधा आणि सुरक्षेसाठी वरील दोन योजना सुरु केल्या. या योजनांचे अनावरण सचिनच्या हस्ते झाले. यानंतर तो बोलत होता.
सचिन म्हणाला, मी 12-13 वर्षाचा असताना एकदा मित्रासमवेत चित्रपट पाहण्याचा बेत आम्ही आखला. चित्रपट पाहून आम्हाला मॅचच्या प्रॅक्ट्रीससाठी लवकर पोहचायचे होते. मात्र आम्हाला उशीर झाला. त्यामुळे आम्ही दादर पश्चिमला लवकरात लवकर जाण्यासाठी शॉर्टकट घेत रेल्वे रूळ ओलांडून जाण्याचे ठरवले. रेल्वे रूळ ओलांडायला सुरुवात करताच दोन्ही बाजूंनी लोकल रेल्वे येत असल्याचे आम्हाला दिसले. दोन्ही रेल्वेच्या मध्येच थांबावे लागल्याने व अंतर थोडे असल्याने आम्ही घाबरलो. हातात क्रिकेट किटची बॅगही होती. ती बॅग खाली टाकली व आम्ही दोघे चपून खाली बसलो. काही क्षणातच दोन्ही रेल्वे गाड्या निघून गेल्या. आम्ही मात्र भेदरलो होतो. त्यावेळचा क्षण आठवला की आजही माझ्या अंगावर काटा येतो. तेव्हापासून मी कधीच रेल्वे रूळ ओलांडला नाही असे सांगत सचिनने तुम्हीही रेल्वे रूळ कधीही ओलांडू नका असे उपस्थितांना आवाहन केले.
सचिन म्हणाला, मी काकूकडे दादरला रहायचो. त्यामुळे घरी जाताना रेल्वेने नेहमीच प्रवास केला. त्यावेळी माझ्या पाठीवर कायम क्रिकेट किटची बॅग असायची. त्यामुळे लोकलमध्ये किती गर्दी असते आणि किती त्रास होतो याची मला जाणीव आहे. मुंबईत रोज 60-70 लाख लोक प्रवास करतात. युरोपातील अनेक देशांची लोकसंख्या एवढीच आहे, असेही सचिनने सांगितले.
प्रवाशांसाठी रेल्वेच्या योजना-
- लोकलमधील गर्दी, महिला सुरक्षा, रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात, रेल्वेतील चो-या, टपावर बसून धोकादायकरित्या प्रवास करणे असो की दरवाजाच्या तोंडात उभे राहून होणारे अपघात असो याला प्रतिबंध बसावा यासाठी रेल्वेने नागरिकांसाठी समिप ही योजना आणली आहे. सेल्फी अलर्ट मॅसेजेस एक्सक्लुसिव्हली फॉर पॅसेंजर्स (SAMEEP) योजना सुरु करण्यात आली आहे.
- यासाठी रेल्वेने 7208015207 या क्रमाकांवर नविन हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे.
- एखाद्या घटना, प्रसंगादरम्यान काही मदत भासल्यास रेल्वे प्रवासी या क्रमांकावर मिस कॉल देऊन माहिती देऊ शकता किंवा MH RLYCOP असे टाईप करून या क्रमांकावर SMS करू शकता. ज्याद्वारे तुम्हाला मदत मिळेल. यासाठी प्रवासी सुरक्षा मोहिम बी-सेफ ही योजना सुरु केली आहे.
बातम्या आणखी आहेत...