आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनच्या शाळेतील विद्यार्थिनींना घवघवीत यश, अबोली बोरसेने मिळवले पैकीच्या पैकी गुण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अबोली बोरसे - Divya Marathi
अबोली बोरसे
मुंबई - दादरच्या बालमोहन विद्यामंदिर शाळेने दरवर्षीप्रमाणे यंदाही यशाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे. दहावीच्या परीक्षेत शाळेचा एकूण 98.51 टक्के निकाल लागला आहे. यात अबोली बोरसे या विद्यार्थिनीने पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. शाळेतल्या 49 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले. इंग्रजी माध्यमात 36 विद्यार्थ्यांना 90 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे या वर्षी विद्यार्थ्यांनी इंग्रजी प्रथम भाषा घेऊन परीक्षा दिली. मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याच शाळेत शिकला आहे. 
 
टेन्शन नको
शंभर पैकी शंभर गुण मिळवणारी अबोली बोरसे म्हणाली की, मनाला वाटले तितका अभ्यास मी केला. घरातूनही अभ्यासासाठी कोणी मागे लागले नाही. जितका वेळ द्यायचा तेवढाच मी दिला. विशेष म्हणजे केवळ अभ्यास न करता पेंटिंग, नृत्य हे छंद देखील जोपासले. त्यामुळे कल्चरल विषयात चांगले मार्क मिळू शकले. अबोलीला संस्कृतमध्ये 98, समाजशास्त्र मध्ये 98 आणि सायन्समध्ये 95 गुण मिळाले आहेत. डॉक्टर होण्याची इच्छा असलेली अबोली म्हणते, की दहावीचे टेन्शन अजिबात घेऊ नका. आठवी नववी प्रमाणेच अभ्यास करा. उलट बोर्डाचे पेपर सोपे असतात. पेपर सोपे आहेत म्हणून ते गृहितही मानून चालू नका. 

दहावीचा प्रवास एन्जॉय करा
इंग्रजी माध्यमात 99.40 टक्के मार्क मिळवणारी रिया वैद्य सांगते की शाळेतील शिक्षक आणि घरच्यांच्या पाठिंब्यामुळे हे यश मिळू शकले. पण प्रत्येक विद्यार्थ्याने दहावीचा प्रवास एन्जॉय केला पाहिजे. अभ्यास करताना चढ उतार येतात पण त्याचा ताण घेऊ नका. आपले छंद पण तेवढेच जोपासा. रियाने आर्किटेक्चर होण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

लक्ष केंद्रित करा
कोणताही ताण न घेता अभ्यासावर लक्ष केंद्रित करून मेहनत घेतल्यास यश तुमचेच आहे असे नायशा या टॉपरने सांगितले. नायशाने परीक्षेच्या शेवटच्या तीन महिन्यांत अभ्यासासाठी खूप मेहनत घेतली. कार्डिओलॉजिस्ट होण्याची तिची इच्छा आहे.
 
पाठीवर बस स्टॉप कोसळला तरी साक्षीने मिळवले 95 टक्के
साक्षी कनावजेसाठी दहावीचे वर्ष आव्हानात्मक ठरले. 9 फेब्रुवारीला तिच्या अंगावर अचानक बस स्टॉप कोसळला. तिच्या पाठीला गंभीर दुखापत झाली. एक महिन्यावर परीक्षा होती. पण हिम्मत आणि जिद्द या बळावर तिने दहावीची परीक्षा दिली आणि 95.60 टक्के गुण मिळवले. वैद्यकीय क्षेत्रात करियर करण्याची इच्छा असलेली साक्षी म्हणते की पाठीला लागल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला पण मी प्रयत्नांची पराकाष्ठा सोडली नाही. प्रत्येक विद्यार्थ्याने हाच मार्ग पत्करला तर यश हे मिळणारच असे ती आत्मविश्वासाने सांगते.