आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महायुतीचा मतदार शिट्टीला नाकारणार, भाजपचा अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कमळ चिन्ह न घेता स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांचा आग्रह त्यांना गोत्यात आणणारा ठरला असून ‘युती’चा मतदार ‘शिट्टी’ला पाठ दाखवण्याचा अंदाज ‘भाजप’ने केलेल्या एका सर्वेक्षणात करण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूकपूर्वी तीन वेळा देशातील सर्व मतदारसंघांचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये माढा मतदारसंघात कमळास 30 टक्के मते दाखवण्यात आली होती. मात्र, माढा मतदारसंघ या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आला आहे.

माढा स्वाभिमानीला सोडण्यात येईल. पण पक्षाकडे निवडणूक चिन्ह नाही. यंदाच्या निवडणुकीत देशात नरेंद्र मोदी लाट आहे. माढा मतदारसंघ शरद पवारांचा आहे. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे कडवे आव्हान तेथे असेल. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनी कमळावर निवडणूक लढवावी, असा आग्रह भाजपने धरला होता.

मात्र, राजू शेट्टी यांनी हा सल्ला मानला नाही. शेवटी भाजपने त्यांना सर्वेक्षणाचे निष्कर्ष दाखवले. कमळ आणि धनुष्य जनतेच्या मनात ठसलेले आहे. तुम्ही स्वतंत्र निवडणूक लढवाल तर घात होईल, असा सल्ला भाजपच्या नेत्यांनी शेट्टी-खोत यांना दिला होता.

2009 मध्ये ‘राष्ट्रवादी’च्या शरद पवार यांना माढय़ात प्रथम क्रमांकाची 5,30, 596 (57%) मते मिळाली होती. ‘भाजप’च्या सुभाष देशमुख यांना 2,16,137 (23%), ‘रासप’च्या महादेव जानकर यांना 98,946 (10 %) तर ‘बसप’च्या राहुल सरवदे यांना 16,737(2%) मते प्राप्त झाली होती.

2009 ची निवडणूक तशी एकतर्फी होती. तरी, कमळाने 23 % मिळवली होती. भाजपने केलेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात माढय़ात कमळाला 30 % मते दाखवली आहेत. गेली तीन दशके शिवसेना-भाजपची राज्यात युती आहे. धनुष्यबाणाचा मतदारही कमळाला सरावलेला आहे. त्यामुळे खोत यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा भाजपचा हट्ट होता.

मोदी लाटेचा लाभ नाही
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची सर्वदूर लाट आहे. त्या लाटेचा कमळ-धनुष्याला निश्चित लाभ होईल. मात्र, स्वतंत्र चिन्हांवर निवडणूक लढवणारे या लाभांपासून वंचित राहण्याची शक्यता भाजपमधूनच सध्या वर्तवण्यात येत आहे.

राजू शेट्टींना अडचण नाही
हातकणंगलेमधून राजू शेट्टी उभे आहेत, तर माढय़ातून सदाभाऊ खोत निवडणूक लढवत आहेत. शेट्टी यांना ‘शिट्टी’ या स्वतंत्र चिन्हाची अडचण नाही. कारण शेट्टी यांनी मतदारसंघाची बांधणी केलेली आहे. तसेच मतदारसंघात त्यांची स्वतंत्र ओळखही आहे. त्यामुळे या मतदारसंघात खोत यांना कमळ चिन्ह नाकारल्याचा फटका बसू शकतो.