आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खनिकर्म विकासासाठी नागपुरात विद्यापीठ, सेंट पीटर्सबर्ग येथे करार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील खनिकर्म उद्योगाच्या विकासासाठी मंगळवारी सेंट पीटर्सबर्ग येथील खनिकर्म विद्यापीठ आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात सामंजस्य करार झाला. या करारानुसार नागपूर येथे खनिकर्म विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. तसेच रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथील जगप्रसिद्ध हर्मिटेज म्युझियम आणि मुंबई महापालिका यांच्यात सामंजस्य करार झाला. या माध्यमातून कला व संस्कृतीच्या संवर्धन व विकासासाठी संयुक्तरीत्या प्रयत्न करण्यात
येणार आहेत.

मंगळवारी सेंट पीटर्सबर्ग येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सेंट पीटर्सबर्ग खनिकर्म विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. रशियातील खनिकर्म आणि धातू निर्मिती क्षेत्राच्या विकासात १७७३ मध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठाचे मोठे योगदान आहे. राज्यातील विशेषत: विदर्भातील विपुल आणि वैविध्यपूर्ण खनिज संपत्ती लक्षात घेता खनिकर्म उद्योगाचा विकास होण्यासाठी नागपूर येथे खनिकर्म विद्यापीठाची स्थापना करण्याचे या वेळी निश्चित करण्यात आले. यासाठी सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठाचे सहकार्य घेण्यात येणार आहे. या विद्यापीठाचे प्रतिनिधी प्रा. व्लादीमीर लिटविनेंको आणि मुख्यमंत्र्यांची व्यापक चर्चा झाली. खनिकर्म क्षेत्राच्या विकासाबरोबरच कोळशाद्वारे करावयाच्या विद्युत निर्मितीसाठी महाजेनकोची कार्यपद्धती अत्याधुनिक करण्याबाबतही हे विद्यापीठ सहकार्य
करणार आहे.
‘अायटी’सह विविध क्षेत्रात महाराष्ट्राला मदतीची ग्वाही
सेंट पीटर्सबर्गचे गव्हर्नर जॉर्जी पोल्ताव्हचेन्को यांच्याशीही फडणवीस यांनी चर्चा केली. जहाज बांधणी, माहिती तंत्रज्ञान, उच्च शिक्षण, नगर विकास, स्मार्ट सिटी, जल शुद्धीकरण आदी क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याबाबत या वेळी चर्चा झाली. सेंट पीटर्सबर्गनेही या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राला साहाय्य करण्याची तयारी दाखविली आहे. आगामी वर्ष ‘व्हिजिट महाराष्ट्र इअर’ म्हणून साजरे होत आहे. त्यामुळे या प्रांतातून पर्यटक यावेत यासाठी सहकार्याची अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...