आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी कर्मचाऱ्यांना हवा वेतन आयोग; मंत्री म्हणतात, 25 वर्षे देणे शक्य नाही; निलंबनाचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सातव्या वेतन आयोगासाठी ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मंगळवारी एकही एसटी बस धावली नाही. त्यामुळे दिवाळसणासाठी निघालेल्या सुमारे ८० लाख प्रवाशांचे हाल झाले. सातवा वेतन आयोग िदल्याशिवाय संप मागे घेणार नाही, अशी भूमिका कामगार संघटनांनी घेतली. तर, येत्या २५ वर्षांतसुद्धा सातवा वेतन आयोग देणे शक्य नसल्याचे सांगत या संपामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप परिवहनमंत्री िदवाकर रावते यांनी केला. दरम्यान, एसटी संपाची संधी साधत खासगी बस व वाहनांनीही अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची लूट केली. बुधवारी सकाळी संपकरी कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत तर त्यांना निलंबित करून कंत्राटी कामगारांची नेमणूक करू, असा इशारा राज्य सरकारने दिला आहे.

सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संपामुळे सुमारे १७ हजार बस डेपोमध्ये उभ्या राहिल्या. या संपात १ लाख ७ हजार कर्मचारी सहभागी असून इंटक ही काँग्रेसप्रणीत कामगार संघटना संपात मुख्य भूमिकेत आहे.

संप बेकायदाच
परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती नाजूक आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग पुढील २५ वर्षांतसुद्धा देणे शक्य नाही, हा संप बेकायदा आहे. हे काँग्रेसचे षड‌्यंत्र आहे, असा आरोप करत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन महामंडळाने ४ हजार खासगी वाहने उतरवली होती, असा दावा परिवहनमंत्री िदवाकर रावते यांनी केला.

तोडगा निघेल -मुख्यमंत्री
संपावर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन केली आहे. संप चिघळणार नाही आणि ऐन दिवाळीत प्रवाशांची गैरसोय होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिले.

कामगार संघटनांनी २९ सप्टेंबर रोजी सरकारला संपाची  नोटीस दिली होती. त्याची दखल सरकारने घेतली नाही. त्यामुळे संपाचा निर्णय घेतल्याचे इंटकचे अध्यक्ष व काँग्रेसचे माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी  सांगितले. संपाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. 

एसटीपेक्षा कमी भाड्यात ५० खासगी बस सेवेत
एसटीच्या संपामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी नाशिक विभागात अारटीअाेच्या सूचनेनुसार चाैधरी ट्रॅव्हल्सच्या ५० हून अधिक बसचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. या बस धुळे, औरंगाबाद, नंदुरबार, पुणे या मार्गावर सोडण्यात आल्या. विशेष म्हणजे एसटीपेक्षा कमी भाडे या बसना आकारण्यात आल्याचे चाैधरी ट्रॅव्हल्सचे संचालक ब्रिजमाेहन चाैधरी यांनी सांगितले.

खासगी वाहनांनी केली लूट
मंगळवारी एसटी बंद म्हटल्यावर प्रवाशांना खासगी वाहनाशिवाय पर्याय नव्हता. मात्र, खासगी वाहनांनी ऐनवेळी चार ते पाचपट भाडे वाढवले. तरीही प्रवाशांना दुसरा पर्याय नसल्याने अनेक प्रवाशांनी मिळेल त्या वाहनांनी इच्छित स्थळ गाठले. छोट्या वाहनांनीही किलाेमीटरमागे आकारले जाणारे दर भरमसाट वाढवले.
बातम्या आणखी आहेत...