आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षारग्रस्त चार लाख हेक्टर जमीन शेतीयाेग्य बनणार, मराठवाडा- विदर्भातील ८९४ गावांतील प्रश्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दुष्काळग्रस्त विदर्भ, मराठवाड्यातील जमिनीतून वर्षानुवर्षे पाणी उपसा केला जाताे. मात्र, भूगर्भातील पाणीपातळी घटल्याने जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढले आहे. या भागातील सुमारे ८९४ गावांमध्ये सुमारे सव्वाचार लाख हेक्टर जमीन क्षारग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. ही जमीन सहा वर्षांत लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार असून त्यादृष्टीने अहवाल तयार करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत नुकतीच एक बैठक झाली. जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या कर्जातून हे काम केले जाणार आहे.

विदर्भ - मराठवाड्यातील दुष्काळ निवारणासाठी जागतिक बँकेकडे मुख्यमंत्र्यांनी कर्ज मागितले होते. जागतिक बँकेनेही त्याला मंजुरीची तयारीही दाखवली. यानंतर या दाेन्ही विभागांतील ४८९४ गावांतील दुष्काळ निवारणासाठी काय करता येईल याचा अभ्यास सरकार करत अाहे. मुख्यमंत्र्यांकडे नुकत्याच झालेल्या बैठकीत या सर्व गावांचा अहवाल सादर करण्यात आला. यापैकी ८९४ गावांमध्ये सव्वाचार लाख हेक्टर जमीन क्षारग्रस्त असल्याने तेथे पीक घेणे अशक्य हाेत असल्याचे आढळून आले.

१९ काेटींचा खर्च अपेक्षित
क्षारग्रस्त जमिनीत जिप्समचा वापर करून ही पुन्हा जमीन वापरात आणण्याचा प्रयत्न केला जाणार असून यासाठी १९ कोटी रुपये लागण्याचा अंदाज आहे. तसेच जमिनीखाली चर खोदून ते लांबवर नेऊन क्षारयुक्त पाणी वाहून नेण्याबाबतही विचार केला जाणार आहे. जलयुक्त शिवारची योजना अमलात आणली जाणार असून अशा जमिनीत जलयुक्त शिवारसाठी खाली प्लास्टिक अंथरता येईल का याचाही विचार केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जागतिक बँकेने या योजनेला प्राथमिक मंजुरी दिली असून जागतिक बँकेचे अधिकारी, कृषितज्ज्ञ आणि कृषी महाविद्यालयातील अधिकारी एकत्र येऊन प्रकल्प अहवाल तयार करणार आहेत. ही योजना यशस्वी झाल्यास राज्याच्या अन्य भागातील क्षारग्रस्त जमिनीसाठीही याचा वापर केला जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

असा नष्ट हाेताेय शेतीचा पाेत
पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त असणारे अन्नघटक जमिनीच्या दोन ते तीन मीटर खोल असतात. त्याच्याखाली पिकाला हानिकारक ठरणाऱ्या क्षाराचे प्रमाण जास्त असते. क्षाराचे प्रकार व त्याची तीव्रता त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असते. केवळ समुद्रकिनारी सापडणाऱ्या सोडियम क्लोराइडमुळेच (मीठ) नव्हे, तर क्लोराइड, कार्बोनेट, बायोकार्बोनेट किंवा सल्फेटसारख्या क्षारामुळे जमिनीचा पोत नष्ट होतो. विंधन विहिरीतून मोठ्या प्रमाणावार पाणी उपसा केल्याने जमिनीतील क्षार वर येतात.
बातम्या आणखी आहेत...