मुंबई - 13 वर्ष जुन्या हिट अँड रन खटल्यात शिक्षा मिळताच अभिनेता
सलमान खानला बुधवारी हायकोर्टाने दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. पण त्याच्या अडचणी अजून संपलेल्या नाहीत. तो तुरुंगात जाणार की नाही, याबाबतचा निर्णय हायकोर्टाच्या शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीत होणार आहे. सलमानला दोन दिवसांचा जामीन मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा राहिला तो, ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांचा. साळवे हे भारतामधीलच नव्हे तर जगभरातील महागड्या वकिलांपैकी एक आहेत. देशातील अनेक न्यायालयांमध्ये त्यांनी खटले लढलेले आहेत. 1999 ते 2002 दरम्यान भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ते देशातील सर्वात यशस्वी वकिलांपैकी एक आहेत.
CA चा बनला वकील
हरीश साळवे यांचा जन्म महाराष्ट्रातील नागपूर शहरात 1956 मध्ये झाला होता. तेथेच वाणिज्य शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर साळवे यांनी सीए(चार्टर्ड अकाऊंटंट) चे शिक्षण सुरू केले. सीए झाल्यानंतर ते टॅक्सेशन स्पेशालिस्ट बनले. साळवे यांना वकील बनण्याची प्रेरणा नानाभोय पालकीवाला यांच्याकडून मिळाली. त्यांनी वकिलीची सुरुवात 1980 मध्ये केली होती.
अनेक हाय प्रोफाइल खटले चालवले
साळवे यांनी अनेक हाय प्रोफाईल खटले चालवले आहेत. अंबानी बंधुंमध्ये कृष्णा गोदावरी गॅस बेसिन केसमध्ये हरिश साळवे यांनी मुकेश अंबानींच्या बाजुने खटला लढला होता. तसेच टाटा ग्रुप, ITC लिमिटेड, तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री
जयललिता यांच्यासह अनेक हायप्रोपाईल खटले त्यांनी चालवले आहेत.
पियानो वाजवण्याचा छंद
हरीश साळवे यांचे वडील नरेंद्र कुमार साळवे काँग्रेस नेते होते. तर त्यांचे आजोबा हे प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर होते. वकिलीशिवाय हरीश साळवे यांना संगीत ऐकण्याचीही आवड आहे. त्यांना पियानो वाजवण्याचाही छंद आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, हरीश साळवे यांचे काही फोटो...