आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानच्या खटल्यातील न्यायाधीश देशपांडे यांची बदली, 6 मे रोजी निकालपत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील ८८ जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश निघाले असून त्यात अभिनेता सलमान खानविरोधातील हिट अँड रन' खटल्याचे न्या. डी. डब्ल्यू. देशपांडे यांचाही समावेश आहे. मात्र, ६ मे रोजी या खटल्याचा निकाल दिल्यानंतरच न्या. देशपांडे बदलीच्या नव्या जागी रुजू होणारआहेत. मुंबई हायकोर्टाचे रजिस्ट्रार जनरल मंगेश पाटील यांनी जिल्हा व कामगार कोर्टाच्या न्यायाधीशांच्या बदल्यांचा आदेश सोमवारी काढला आहे. बदली झालेल्या न्यायाधीशांनी सुनावणी पूर्ण झालेल्या खटल्यांच्या निकालाचे काम पूर्ण करूनच नव्या जागी रुजू व्हावे, असे या आदेशात स्पष्ट केलेले आहे.

त्यामुळे सलमानचा ‘हिट अँड रन’ या खटल्याचा निर्णय आता कोणत्याही परिस्थितीत लांबणीवर पडणार नाही. ६ मे रोजी सकाळी अकरा वाजता सलमानच्या गाजलेल्या या खटल्याचे निकालपत्र जाहीर केले जाणार आहे. उच्च न्यायालयाशेजारील मुंबई शहर सत्र न्यायालयात चालू असलेली सलमानच्या खटल्याची सुनावणी २४ एप्रिल रोजी संपली होती. या खटल्याचा अभ्यास करण्यासाठी किमान १५ दिवस लागणार होते. त्यामुळे ६ मे रोजी सलमानच्या खटल्याचे निकालपत्र जाहीर केले जाईल असे न्यायाधीशांनी जाहीर केले होते. तत्पूर्वी न्यायाधीशांच्या बदल्या झाल्याने सलमानच्या खटल्याचा निकाल पुन्हा लांबताे की काय? अशी शक्यता निर्माण झाली होती; परंतु सुनावणी पूर्ण झालेल्या खटल्यांचे निकाल देऊनच न्यायाधीशांनी बदलीच्या जागी रुजू व्हावे असे आदेशात स्पष्ट केले असल्याने सलमानचा फैसला नियोजित तारखेप्रमाणे ६ मे रोजी होणार आहे.