आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिट अँड रन प्रकरणातील मृताच्या मुलाचे पाऊल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हिट अँड रन प्रकरणात प्राण गमवावा लागलेल्या नुरुल्ला शरीफ यांचा मुलगा फि‍रोज शेख याला अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही. यामुळे तो मोटार अपघात दावा लवादात (एमएसीटी) दावा करण्याच्या तयारीत आहे. निकाल त्याच्या बाजूने लागला तर त्याला तीन ते दहा लाख रुपयांची भरपाई मिळू शकते, अशी माहिती त्याचे वकील ए. ए. हमदानी यांनी दिली.

हमदानी यांनी नुरुल्ला यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी बेगम जहाँ आणि मुलगा फि‍रोज यांच्या वतीने २००२ मध्ये लवादात तीन लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा सादर केला होता. त्यावेळी विमा कंपनीच्या वकिलांकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. हमदानी म्हणाले, तेव्हा नुरुल्ला आणि जखमींवर अवलंबून असलेल्यांच्या नावावर सलमान खानने १९ लाख रुपये कोर्टात जमा केले होते.

त्या वेळी कोर्टाने नुरुल्लांच्या वारसासाठी १० लाख रुपये आणि उर्वरित नऊ लाख तिघा जखमींना प्रत्येकी तीन लाख रुपये या हिशेबाने या प्रकरणाचा निकाल आल्यानंतर वितरित करण्याची तरतूद केली होती. त्याचाच फायदा घेत त्या वेळेस विमा कंपनीच्या वकिलांनी नुरुल्ला यांच्या मुलाला भरपाई देण्यास नकार दिला होता. कोर्टाचा निकाल आल्यानंतर सलमान खानने कोर्टात जमा केलेल्या १९ लाख रुपयांतून नुरुल्लांच्या वारसांना पैसे मिळणार आहेत. त्यामुळे स्वतंत्रपणे नुकसान भरपाई देण्याची गरज नाही, असा युक्तिवाद विमा कंपनीने केला होता.

आता या प्रकरणाचा निर्णय आला असल्याने सलमानने जमा केलेल्या १९ लाख रुपयांच्या रकमेचे काय करणार याबाबत उच्च न्यायालयालाच आदेश द्यावा लागेल, असे हमदानी यांनी सांगितले. परंतु ते सोमवारी मोटार अपघात दावा लवादाकडे नुकसान भरपाईसाठी पुन्हा दावा करणार आहोत, जेणेकरून त्यांच्या कुटुंबीयांना याचा फायदा होईल.
नव्याने दावा करणार
^२००२ मध्ये आपण तीन लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा केला होता. पण आता नुकसान भरपाईची रक्कम वाढवून पुन्हा नव्याने दावा करण्यात येईल. या प्रकरणात लवादाचा निकाल लवकर लागण्याची शक्यता कमी आहे. पण जर हा निकाल आपल्या बाजूने लागला तर हिट अँड रन प्रकरणातील पीडितांना निश्चितपणे काही तरी आर्थिक आधार मिळेल.
- ए. ए. हमदानी, वकील