मुंबई - अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणातील सर्व कागदपत्रे नव्याने पुन्हा उच्च न्यायालयासमोर शुक्रवारी सादर करण्यात आली. दरम्यान, कागदपत्रांवर अभ्यास करायचा असल्याने सलमानचे वकील अमित देसाई यांनी सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. यावर न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली.
हिट अँड रन प्रकरणाची न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. अलीकडेच झालेल्या सुनावणीत सलमानचे वकील देसाई यांनी या प्रकरणातील काही कागदपत्रे गहाळ असल्याचे सांगत ती पुन्हा देण्याची मागणी केली. यावर न्यायालयाने नव्याने कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. शुक्रवारी या प्रकरणातील सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली. सुनावणीदरम्यान सलमानची बहीण अलविरा न्यायालयात हजर होती. २००२ मध्ये सलमानने बेदरकारपणे गाडी चालवून पाच जणांना उडवले होते. यात एकाचा मृत्यू तर चार जण जखमी झाले होते.