आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटील यांची साक्ष ग्राह्य धरणे अयोग्य, उच्च न्यायालयाचे निरीक्षण, हिट अँड रन प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता सलमान खानचा सहभाग असलेल्या हिट अँड रन प्रकरणात मृत मुख्य साक्षीदार व सलमानचा अंगरक्षक रवींद्र पाटील यांची साक्ष ग्राह्य धरणे अयोग्य ठरेल, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान नोंदवले. दरम्यान, या प्रकरणात सलमानच्या शिक्षेबाबतचा निकाल गुरुवारी लागण्याची शक्यता आहे.

न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांच्या खंडपीठात याप्रकरणी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालय म्हणाले, २८ सप्टेंबर २००२ च्या मध्यरात्री अपघात झाल्यानंतर पाटील यांनी सलमानविरोधात तक्रार नोंदवली. मात्र, तो मद्याच्या अमलाखाली गाडी चालवत होता का? याचा उल्लेख कुठेही केला नाही. सलमानच्या रक्ताच्या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पाटील यांनी सलमानने दारू प्राशन करून गाडी चालवल्याची साक्ष न्यायालयात दिली. या खटल्यात पाटील यांची साक्ष कायद्याच्या तरतुदीनुसार ग्राह्य धरता येणार नाही. रवींद्र पाटील यांचा २००७ मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे याआधी त्यांनी दिलेले जबाब न्यायालयात सादर करण्यात आले. त्या वेळी सत्र न्यायालयाने पाटील यांची साक्ष ग्राह्य धरत सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, पाटील सध्या साक्ष देण्यासाठी हयात नसल्याचे सलमानच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.

सलमानने सत्र न्यायालयाने सुनावलेल्या पाच वर्षांच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयात या खटल्यावरील आरोपपत्राचे वाचन सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी यावरील अंतिम निकाल येऊ शकतो. २००२ मध्ये सलमानने बेदरकारपणे गाडी चालवून पाच जणांना उडवले होते. यात एकाचा मृत्यू, तर चार जण जखमी झाले होते. याप्रकरणी सलमानवर सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल आहे. सलमानच्या अपिलावर गुरुवारी निकाल अपेक्षित अाहे.