आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान तर सुटला, मग गाडी चालवत कोण होता ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘हिट अँड रन’ प्रकरणात अभिनेता सलमान खानच्या खटल्याची तातडीने सुनावणी घेतली जावी म्हणून जनहित याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘हा निकाल न्यायालय आणि तपास यंत्रणा यांच्यावरील विश्वास उडवण्यास कारणीभूत ठरू शकतो,’ असे मत याचिकाकर्ते निखिल वागळे आणि आभा सिंग यांनी व्यक्त केले आहे. या निकालाला सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने आव्हान द्यायलाच हवे, अशी मागणी सिंग यांनी केली. हा अपघात घडला तेव्हा गाडी नेमका कोण चालवत होता? सलमानचा चालक अशोक सिंह चालवत होता हा युक्तिवाद उच्च न्यायालयाने मान्य केला असेल तर सिंहला शिक्षा का सुनावली नाही? असे प्रश्नच आभा सिंग यांनी उपस्थित केले आहेत.

‘अंगरक्षक रवींद्र पाटीलने दिलेली साक्ष व अन्य पुरावे ग्राह्य धरून सत्र न्यायालयाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा दिली होती. हा कालावधी उच्च न्यायालयाने कमी केला असता तर ते समजू शकले असते, पण पाटील याची साक्ष व इतर पुरावे पुरेसे न मानता सलमान खानची उच्च न्यायालयाने मुक्तता केली.

या निकालामुळे काही प्रश्नही निर्माण होतात. सलमान खान गाडी चालवत नव्हता, तर मग त्याची गाडी नेमके कोण चालवत होते हे अजूनही पुढे आलेले नाही. वांद्रे येथे सलमानच्या गाडीखाली चिरडली जाऊन जी माणसे मेली ती नेमकी कोणी मारली? हा प्रश्नही उरतोच,' अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार वागळे यांनी व्यक्त केली.
तपास यंत्रणांवरच कारवाई करावी
-‘२८ सप्टेंबर २००२ ला ही भीषण घटना घडली. त्या दिवशी सकाळी मी वांद्रे येथे घटनास्थळी गेलो होतो. तेथील मजूर सलमान गाडी चालवत असल्याचे सांगत हाेते. त्यामुळे या प्रकरणातील सत्य नेमके काय आहे हे अजूनही पुढे आलेले नाही. सलमानच्या गाडीखाली चिरडल्या गेलेल्या लोकांना न्याय मिळावा म्हणून मी व काही समविचारी लोकांनी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती. सलमान खानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप दाखल करावा, अशी मागणी आम्ही याचिकेत केली होती. या प्रकरणात पोलिस तर पहिल्यापासूनच ही केस दुबळी कशी होईल याचा प्रयत्न करीत होते. सत्र न्यायालयाने योग्य निकाल दिला नव्हता असे जर मुंबई उच्च न्यायालयाचे मत झाले असेल तर या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस अधिकारी व न्याययंत्रणेतील संबंधित लोकांवर मुंबई उच्च न्यायालयाने आता कारवाई करायला हवी.
निखिल वागळे, याचिकाकर्ते
सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे
Ãउच्च न्यायालयाने सलमानची निर्दोष मुक्तता केली असली तरी या निकालाविरुद्ध राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात जाणे आवश्यक आहे. रवींद्र पाटीलने दिलेली साक्ष तसेच इतर पुराव्यांकडे विशेष लक्ष दिले गेलेे नाही. सलमानच्या गाडीत असलेला कमाल खान हा साक्षीदार आहे. अपघात झाला त्या वेळी सलमानच गाडी चालवत होता, असा जबाब कमाल खानने याआधी दिला आहे. त्यामुळे त्याला लंडनहून बोलावण्यासाठी न्यायालयाने आदेश द्यावा, अशी विनंती शासनाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली पाहिजे.खान हजर झाल्यास सत्य उजेडात येईल. सलमानचा वाहनचालक अशोक सिंह हा दुर्घटनेच्या वेळेस गाडी चालवत होता, असे सांगितले जात असेल तर मग त्याला न्यायालयाने शिक्षा का सुनावली नाही? न्याययंत्रणेवरचा लोकांचा विश्वास कायम राहावा, असे वाटत असेल सरकारने सर्वाेच्च न्यायालयात जावेत.
अॅड. आभा सिंग, याचिकाकर्त्या
पुढे वाचा, महिला वकिलांचे फ्लाइंग किस