आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानने केली उच्च न्यायालयाचीच दिशाभूल, अनेक प्रश्‍न अनुत्‍तरित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हिट अँड रन प्रकरणात सलमान खानला मुंबई सत्र न्यायालयात पाच वर्षांची शिक्षा ठोठावली जाण्यात महत्त्वाची भूमिका वठवणारे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी उच्च न्यायालयाने सलमानला निर्दाष सोडल्याच्या निर्णयावर मात्र आश्चर्य व्यक्त केले आहे. सलमान खानने उच्च न्यायालयाची दिशाभूल केल्याचा दावाही घरत यांनी केला. रवींद्र पाटीलची साक्ष ग्राह्य न मानणे आणि कमाल खानला साक्षीला का बोलावले नाही, अशी उच्च न्यायालयाने विचारणा करणे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान राज्य सरकारच्या वतीने घरत यांनी सलमान खानविरुद्ध प्रभावी युक्तिवाद केला होता. तसेच सलमानच्या वतीने सादर करण्यात आलेले अनेक पुरावे व साक्षीदारांची चिरफाडही केली होती. त्यामुळेच सलमानला पाच वर्षांची शिक्षा ठाेठावण्यात आली होती.

रवींद्र पाटीलची साक्ष अविश्वासार्ह?
उच्च न्यायालयाने सलमान खानचा अंगरक्षक रवींद्र पाटीलची साक्ष पूर्णत: विश्वासार्ह नसल्याचे मत मांडले आहे. मात्र " न्यायालयाने ही भूमिका का घेतली, हे त्यांचे निकालपत्र वाचल्यावरच कळेल. मात्र रवींद्र पाटीलची साक्ष विश्वासार्ह मानायलाच हवी, अशी भूमिका मी सत्र न्यायालयात मांडली होती. कारण अपघात घडेपर्यंत पाटील हे सलमानसोबत होते. सलमान किंवा त्याच्या परिवाराने आजवर एकदाही पाटील यांच्या मनात सलमानबद्दल आकस वा सूडभावना होती, असा आरोप केलेला नाही. उलट पाटील हा सलमानचा आदरच करीत होता, असे सलमानचा चालक अशोक सिंहने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले आहे. असे असताना पाटील सलमानविरुद्ध का तक्रार करेल? वा त्याच्याविरुद्ध साक्ष देईल? त्यांनी साक्ष तीनदा बदलल्याचा आरोप होत असला तरी तीनही वेळा पाटील यांनी सलमानमुळेच हा अपघात घडल्याचा आणि मृत्यूस सलमानच कारणीभूत असल्याचे प्रत्येक वेळी स्पष्ट केले आहे,' असे घरत यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

अशोक सिंहची साक्ष ग्राह्य धरावी?
सलमानने आपल्या बचावात गाडी आपण चालवत नव्हतो तर अशोक सिंह चालवत होता, असा बचाव केला होता. अशोक सिंहनेही आपणच गाडी चालवत असल्याची साक्ष दिली होती. ही साक्ष ग्राह्य धरायला हवी होती, असे मत उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. मात्र हे मतही धक्कादायक आहे. कारण अपघात घडला तेव्हा आणि आजही अशोक सिंह हा सलमानकडे नोकरी करतो. त्यामुळे त्याच्या मनात मालक म्हणून सलमानबद्दल पूजनीय भाव आहे. सलमानचा एकेक मिनिट मौल्यवान आहे. अशावेळेस आपल्या मालकाला कोर्टाचे खेटे घालावे लागत आहेत, त्यांचे कोट्यवधीचे नुकसान होत आहे, हे बघून आपणच गुन्हेगार आहोत, असे सांगायचे त्याने ठरवले असावे. अपघात झाला तेव्हा मीच वाहन चालवत होतो, असे आपण पोलिसांना सांगितले होते, मात्र त्यांनी माझी साक्ष तेव्हा नोंदवूनच घेतली नाही, असा युक्तिवाद सिंह करीत आहेत. मात्र ही घटना घडल्यावर माध्यमांनी पोलिस स्टेशनला गराडा घातला होता तेव्हा त्यांनी माध्यमांकडे ही तक्रार का केली नाही? किंवा इतके दिवस सुनावणी सुरू असताना न्यायालयाला ही बाब त्यांनी लक्षात का आणून दिली नाही? चित्रपटात ‘ठहरो जजसाब, दोषी मै हूं, असे म्हणत ऐनवेळी नवाच गुन्हेगार हजर होतो हे तरी पाहिल्याचे आठवते ना?’ असे मी अशोक सिंहला त्याच्या उलट तपासणीत विचारले होते, हे सांगतानाचा सिंह हा सलमानला वाचविण्यासाठी उभा करण्यात आलेला खोटा आरोपी आहे,' असा दावा घरत यांनी केला.

सलमानच खान अपघाताच्या वेळी गाडी चालवत होता हे सिद्ध होत नाही
अपघात झाला तेव्हा कमाल खान मागच्या सीटवर तर अंगरक्षक रवींद्र पाटील अाणि सलमान हे समोरच्या सीटवर बसले होते. अंगरक्षक तर वाहन चालवणार नाही, तसा दावाही सलमानने कधी केला नाही. कमाल मागे बसला होता, हेही सलमानतर्फे सांगण्यात आले. अशावेळेस वाहन कोण चालवणार? सलमानच ना?

ज्या हॉटेलमधून सलमान निघाला तेथील पार्किंग विभागाच्या प्रमुखाने स्वत: गाडी काढून देत सलमानला दिली आणि आपण उतरल्यावर सलमानच गाडी चालकाच्या जागेवर बसला होता, अशी साक्षही दिली. मात्र ‘सलमानने दिलेली ५०० रुपयांची टिप जवळच असलेल्या टिप बॉक्समध्ये हा प्रमुख टाकायला गेला तेव्हा आपण चालकाच्या जागेवर जाऊन बसलो,’ असा दावा अशोक सिंहने केला. मात्र ज्या बाजूला चालकाचे आसन होते त्याच बाजूला टिप बॉक्स होते. या दिशेने आलेला आणि जुनी ओळख असलेला अशोक सिंह हा पार्किंग विभाग प्रमुखाला दिसला नाही, हे कसे शक्य आहे? हा प्रश्नही आम्ही सत्र न्यायालयात विचारला होता आणि याचे समाधानकारक उत्तर सिंहला देता आले नाही, याकडेही अॅड. घरत यांनी लक्ष वेधले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, गाडीचे टायर फुटल्याचे सिद्ध होतच नाही