आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक: सलमान खानच्या \'हिट अँड रन\' खटल्याचे रेकॉर्ड सरकारकडेच नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता सलमान खानला ज्या खटल्यात सेशन कोर्टाने 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे त्या ‘हिट अँड रन‘ खटल्याशी संबंधित कोणत्याही फाईल्स व रेकॉर्ड खुद्द राज्य सरकारकडेच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते मन्सूर दर्वेश यांनी सलमानवरील ‘हिट अँड रन‘ खटल्याशी संबंधित सर्व माहिती राज्य सरकारकडे मागितली होती. त्याला उत्तर देताना राज्याच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, मुंबईतील मंत्रालयाला 21 जून 2012 रोजी लागलेल्या आगीत सलमान खानच्या हिट अँड रन खटल्यातील सर्व फाईल्स जळाल्या आहेत. तसेच सरकारकडे त्यापूर्वीचे कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे.
मन्सूर दर्वेश यांनी मागील महिन्यात सलमान खानच्या हिट अँड रन खटल्यातील माहिती राज्याच्या गृहमंत्रालयाकडे मागवली होती. मात्र, या प्रकरणाशी संबंधित सर्व फाईल्स मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याची लेखी माहिती मंत्रालयाने दर्वेश यांना दिली आहे. 21 जून 2012 रोजी मंत्रालयाला लागलेल्या आगीत सर्व फाईल्स जळून खाक झाल्या. त्यामुळे आम्ही ते उत्तर देऊ शकत नाही, असेही त्यात म्हटले आहे. तसेच सलमान खानच्या या प्रकरणात राज्य सरकारला किती खर्च करावा लागला, किती व कोणते वकील नियुक्त करण्यात आले आदी माहितीही विचारली होती. मात्र या खर्चाचा तपशील देण्यास असमर्थ आहोत असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
आपल्याला माहित असेल की जून 2012 मध्ये मंत्रालयाला मोठी आग लागली होती. यात लाखो फाईल्स जळून खाक झाल्या होत्या. महाराष्ट्र सरकारकडे सलमान खानच्या 28 सप्टेंबर 2002 च्या ‘हिट अँड रन‘ प्रकरणातील कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. सलमान खानला या खटल्याप्रकरणी याच महिन्यात सेशन कोर्टाने पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सलमान खानने हायकोर्टात धाव घेतली असून, तेथे त्याच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे या खटल्यावर काही अनिष्ट परिणाम होईल काय? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. सलमान खान सध्या अरब इंडो बॉलिवूड अवॉर्डसाठी दुबईला गेला आहे.
बातम्या आणखी आहेत...