आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानच्या खटल्याची फाइल अागीत जळाली, माहिती अधिकारावरील अर्जातून सत्य बाहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणासंबंधी फाइल २०१२ मध्ये लागलेल्या मंत्रालयाच्या आगीत नष्ट झाल्याची माहिती राज्य सरकारने माहिती अधिकार कार्यकर्त्याला दिली .

मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते मन्सूर दरवेश यांनी राज्य सरकारच्या गृह तसेच विधी आणि न्याय विभागाकडे याप्रकरणी मागितली होती. दरवेश यांच्या या अर्जावर दिलेल्या उत्तरात दोन्ही विभागांनी त्याबाबतची पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले. २१ जून २०१२ रोजी मंत्रालयाला लागलेल्या आगीत या कार्यासनाचा संपूर्ण अभिलेख नष्ट झाला आहे. त्यामुळे त्या आधीच्या कालावधीतील माहिती देणे शक्य नाही, असे उत्तर दरवेश यांना देण्यात आले आहे.

सलमान खानला मुंबई सत्र न्यायालयाने सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवत पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. मात्र, उच्च न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. हिट अँड रन प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरकारी वकील, कायदेतज्ज्ञ तसेच कायदेविषयक सल्लागार यांच्यावर सरकारचा किती खर्च झाला याबाबतची माहिती दरवेश यांनी गृह तसेच विधी आणि न्याय विभागाकडे मागितली होती. सलमानच्या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील म्हणून अॅड. प्रदीप घरत यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना प्रत्येक सुनावणीच्या दिवशी ६ हजार इतके मानधन दिले जात होते, अशी माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली.

विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी मंत्रालयाला लागलेल्या आगीत नष्ट झालेल्या अनेक फाइल्स पुनर्गठीत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून आग लागून तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही अशा महत्त्वाच्या प्रकरणाची फाइल पुनर्गठीत होऊ न शकल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कागदपत्रे नाहीत, ही बाब गंभीर आहे
^राज्य सरकारकडे जर या महत्त्वाच्या प्रकरणाची कागदपत्रे नसतील, तर ही फारच गंभीर बाब आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात अपील करायचे झाल्यास या प्रकरणाची मूळ कागदपत्रे लागतील. त्यामुळे सरकारने या प्रकरणाची फाइल शक्य तितक्या लवकर पुनर्गठीत करावी.
अॅड. अाभा सिंह, ज्येष्ठ विधिज्ञ
बातम्या आणखी आहेत...