आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Same Name Cadidates Stand In Maharashtra Assembly Election 2014

संभ्रम निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा राजकीय पक्षांचा आटापिटा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उपनगरातील मागठाणे मतदारसंघ हा लक्षवेधी ठरला असून येथून मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांना शिवसेनेच्या प्रकाश सुर्वे यांनी जोरदार आव्हान दिले आहे. कुठल्याही परिस्थितीत आमदार बनण्याचा चंग सुर्वेंनी बांधला असून यासाठी त्यांनी अनेक क्लृप्त्या वापरल्या आहेत. प्रवीण दरेकर नामक डमी उमेदवार उभा करून त्यांचे शिवसेनेला समर्थन असल्याचे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. त्यामुळे ओरिजनल प्रवीण दरेकरांची मात्र गोची झाली आहे. यासाठी या भागातील शिवसेना नेत्यांनी एक पत्रक काढून दरेकरांचे शिवसेनेला समर्थन असल्याचा दावा केला आहे. हे पत्रक मतदारसंघातही वाटण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीत रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या नावाचा एक उमदेवार उभा करण्यात आला होता. या डमी उमदेवाराने तब्बल ७५०० मते घेतली होती. अतिशय चुरशीच्या या लढतीत तटकरेंना शिवसेनेच्या अनंत गितेंकडून २२०० मतांनी पराभूत व्हावे लागले. तटकरे नावाचे डमी उमदेवार नसते, तर खरे तटकरे निवडून येऊ शकले असते. तसाचा प्रकार आता मागठाणेत होत आहे. आपल्या विजयाच्या मार्गात असे अडथळे येत आहेत, हे लक्षात येताच ख-या दरेकरांवर एक पत्रक काढून मागठाणे मतदारसंघात घराघरांत पोहोचवण्याची व्यवस्था करावी. तो प्रवीण दरेकर मी नव्हे, माझे नाव प्रवीण यशवंत दरेकर असून माझी निशाणी इंजिन आहे, असे स्पष्टीकरण देण्याची वेळ आली.

हे स्पष्टीकरण देऊन दोन दिवस होत नाहीत, तोच मागठाण्यात एक पत्रक सर्वत्र वाटण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रवीण दरेकर यांचे शिवसेनेस समर्थन असा मथळा असलेले हे पत्रक वाचून मतदारांमध्ये गोंधळ उडाला आहे. या पत्रकाच्या माध्यमातून सुर्वेंना दरेकरांचा पाठिंबा असल्याचे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रकार करण्यात आला असून आपण याविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे दरेकर यांनी सांगितले.

पनवेलातही शेकापविरोधात भाजपची तिरकी चाल!
पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर विरुद्ध शेकापचे बाळाराम पाटील ही लढत चुरशीची होणार आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या ठाकूरांसमोर आपली आमदारकी राखण्यासाठी मोठे आव्हान असल्याने त्यांच्याकडूनही बाळाराम पाटील नावाचा एक डमी उमेदवार उभा करण्यात आल्याचा आरोप ख-याखु-या बाळाराम यांनी केला आहे. ते सांगतात, फक्त यावरच ठाकूरांचे समाधान झालेले नाही. त्यांनी आता सर्वत्र कपबशी निशाणी असलेल्या बाळाराम पाटील यांना निवडून द्या आणि शेतकरी, कामगारांचे भविष्य वाचवा, असे आवाहन करणारे एसएमएस मतदानाच्या आदल्या दिवशी सर्वत्र फ‍िरवले जात आहेत.