आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृह योजनांना एकच नियम, नाना पाटेकर गृह योजनेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने राज्यातील गरीब, आदिवासींसाठी शबरी, इंदिरा आवास आणि राजीव गांधींच्या नावावरील दोन गृह योजना राबविल्या जातात. या योजनांसाठी निधी असूनही गरिबांना घरे मिळाल्याने आता नव्याने या योजनांचा विचार करण्यात येणार आहे. या सर्व योजनांसाठी एकच नियम तयार करून त्या राबविल्या जातील अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.

प्रकाश मेहता यांनी सांिगतले, केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण राज्यात घरांची प्रचंड वणवण आहे. एसआरए स्कीममध्ये प्रचंड गोंधळ असून काही बिल्डरच झोपडपट्ट्या वसवतात आणि नंतर त्या ठिकाणी म्हाडाच्या अधिकार्‍यांच्या मदतीने एसआरए स्कीम राबवून पैसे कमवतात. अशा सर्व गैरप्रकारांना आम्ही आता चाप लावणार आहोत. काही योजनांची माहिती माझ्याकडे आली आहे त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल. राज्यात गोरगरीब आणि आदिवासींसाठी शबरी आवास योजना, इंदिरा आवास योजना आणि राजीव गांधी आवासच्या दोन योजना राबवल्या जात आहेत. यासाठी केंद्राकडून पैसाही येतो. केंद्र सरकार प्रत्येक वर्षी ३५० कोटी रुपये देते परंतु गेल्या पाच वर्षांपासून राज्य सरकारने हे पैसे उचललेच नाहीत. त्यामुळे जवळ-जवळ १५०० कोटी रुपये केंद्राकडे पडून आहेत. केंद्राकडून सर्व योजनांचा पैसा एकत्रच आणून नंतर तो या योजनांसाठी वाटप करून घरे बांधणार आहोत, असे ते म्हणाले. यामुळे गरिबांना मोफत घरेही उपलब्ध करून देता येतील, असेही प्रकाश मेहता म्हणाले.

कुणीही बेघर असू नये
राज्यातएकही व्यक्ती बेघर राहू नये असा प्रयत्न सरकार करणार असून पोलिस, सफाई कामगार, शासकीय कर्मचार्‍यांसाठी तसेच सामान्य जनतेसाठी माफक दरातील घरे बांधणार आहोत. मुंबईत प्रचंड जागा असून ११ लाख घरे बांधण्याची आमची योजना आहे. ४५० चौरस फुटांची वन बीएचकेची ही घरे माफक दरात आम्ही देणार आहोत. याबाबत सविस्तर योजना तयार करण्यात येत असून फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही योजना सादर केली जाईल. गिरणी कामगार मुंबईची ओळख असून त्यांना मोफत घरे दिली जाऊ शकतात असेही मेहता यांनी स्पष्ट केले. म्हाडामध्ये दलालांच्या माध्यमातून अनेकांनी अनेक घरे घेतली आहेत. याबाबत तक्रारी आल्या असून अशा प्रकरणांची चौकशी करण्यात येणार आहे. ज्यांनी गुंतवणूक म्हणून अशी अनेक घरे घेतली आहेत ती परत घेतली जातील,असेही मेहता यांनी स्पष्ट केले.

अभिनेता नाना पाटेकर गृह योजनेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर
राज्यसरकारच्या घरांच्या योजनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नाना पाटेकर यांना ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवण्यात येणार असल्याचे समजते. नागरिकांमध्ये नाना पाटेकर यांची प्रतिमा चांगली असल्याने आणि त्यांचीही नागरिकांबाबतची मते स्पष्ट असल्यानेच त्यांची निवड करण्याचे ठरवले जात असल्याची माहिती हाउसिंग विभागातील सूत्रांनी दिली. याबाबत नाना पाटेकर यांच्याशी प्रकाश मेहता यांचे बोलणे झाल्याचे सूत्रांनी सांगितले.