आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : व्यंगचित्रांच्या माध्यमातून आत्मचरित्र साकारायची तेंडुलकरांची इच्छा अधुरीच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - ख्यातनाम व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांना आपले आत्मचरित्र व्यंगचित्रांच्या माध्यमातून साकारायचे हाेते. त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात अाले असते तर मराठी साहित्यातील व्यंगचित्रकाराचे अशा प्रकारचे पहिले आत्मचरित्र म्हणून त्यांच्या पुस्तकाला बहुमान मिळाला असता. मात्र, तेंडुलकरांच्या निधनाने हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.   
 
मराठी व्यंगचित्रकारांची १९४० च्या दशकातील पिढी डेव्हिड लो या व्यंगचित्रकाराला आपला आदर्श मानत होती. मूळचा न्यूझीलंड असलेला पण त्यानंतर ब्रिटनमध्ये अनेक वर्षे वास्तव्य केलेल्या डेव्हिड लो यांच्या व्यंगचित्रांनी ब्रिटनसहित जगभरातील नेत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. लो या व्यंगचित्रकाराचा आदर्श आर. के. लक्ष्मण व बाळासाहेब ठाकरे यांनी देखील ठेवला होता. मंगेश तेंडुलकरांनाही  लो यांची व्यंगचित्रे आवडत असत. लो यांनी आपले आत्मचरित्र ‘लोज ऑटोबायोग्राफी’ या नावाने लिहिले होते, तेही तेंडुलकरांच्या विशेष आवडीचे होते. १९५७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या आत्मचरित्रामध्ये लो यांनी जीवनचरित्राबराेबरच आपण काढलेल्या व्यंगचित्रांपैकी काही निवडक व्यंगचित्रे तसेच नातेवाइक व सग्यासोयऱ्यांची काही छायाचित्रेही दिली आहेत. ख्यातनाम व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी ‘द टनेल ऑफ टाइम’ हे आत्मचरित्र लिहिले. त्यात लक्ष्मण यांची काही निवडक व्यंगचित्रे दिली आहेत. डेव्हिड लो किंवा आर. के. यांनी ज्या स्वरूपाचे आत्मचरित्र लिहिले आहे तसे मंगेश तेंडुलकर यांना लिहायचे नव्हते. आपल्या आयुष्यातील घटना व्यंगचित्रांच्या माध्यमातून सांगणारे आत्मचरित्र त्यांना लिहायचे होते. त्या दृष्टीने वयाची ७५ वर्षे पूर्ण झाली त्या वेळी त्यांनी असे पुस्तक चितारण्याचे ठरविले होते. 
 
मराठीत व्यंगचित्रकारांचे एकही आत्मचरित्र नाही...   
प्रख्यात चित्रकार दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगावकर हे देखील व्यंगचित्रे काढत असत. परंतु व्यंगचित्रकार म्हणून कारकीर्द अधिक गाजली ती बाळासाहेब ठाकरे यांची. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या मराठी व्यंगचित्रकाराची सर्वप्रथम मोठ्या प्रमाणावर दखल घेतली गेली ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या समकालीन पिढीत श्रीकांत ठाकरे, त्यानंतरच्या पिढीत विकास सबनीस ते आजमितीला प्रशांत कुलकर्णींपर्यंत अशी मराठी व्यंगचित्रकारांची मोठी फळी निर्माण झाली. पण यातील एकाही व्यंगचित्रकाराने आपले आत्मचरित्र लिहिलेले नाही. त्यामुळे मराठी साहित्यात हा व्यंगचित्रकाराचे आत्मचरित्र हा प्रकारच उमललेला नाही. त्याची सुरुवात मंगेश तेंडुलकर यांच्या प्रस्तावित आत्मचरित्राने झाली असती. पण तेही होणे नव्हते.  
बातम्या आणखी आहेत...