आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्रमाातील जप्त अाैषधे साधकांच्या उपचारासाठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सनातन संस्थेच्या पनवेल येथील आश्रमात अमली पदार्थाचा कोणताही साठा आढळलेला नाही. याबाबत कोल्हापूर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने केलेले आरोप खोटे असल्याचा खुलासा सनातन संस्थेच्या वतीने शुक्रवारी करण्यात आला. तपास पथकाने अाश्रमातून जप्त केलेला मुद्देमाल हा अमली पदार्थांचा नसून साधकांवर उपचारासाठी आणली गेलेली ती औषधी होती, असाही दावा संस्थेच्या वतीने करण्यात अाला.

काॅ. गाेविंद पानसरे हत्याप्रकरणी अटकेत असलेला सनातन संस्थेचा साधक वीरेंद्र तावडे याचा ताबा कोल्हापूर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने घेतल्यानंतर मंगळवारी संस्थेच्या पनवेल येथील अाश्रमाची तपासणी करण्यात आली. तब्बल सोळा तास चाललेल्या या छाप्यादरम्यान सनातन आश्रमाच्या आवारात असलेल्या उपचार केंद्रातून अमली पदार्थांचा अंश असलेल्या प्रतिबंधित औषधांचे खोके जप्त करण्यात आल्याची माहिती तपास पथकामार्फत देण्यात आली होती. यापैकी अनेक औषधे मानसिक रोगावरील उपचारादरम्यान वापरली जात असून ही औषधे प्रसादात मिसळून साधकांना दिली जात होती. साधकांच्या मानसिक स्थितीवर पूर्ण नियंत्रण ठेवून त्यांच्यावर सनातन संस्थेचे विचार लादणे या औषधांच्या वापरामुळे सोपे होत असल्याचा दावाही पोलिसांनी केला होता. मात्र हे आरोप खोटे असून ही औषधे आश्रमातील काही साधकांसाठीच खरेदी केली जात असल्याचा दावा सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला.

पनवेल येथील आश्रमात साधारण शंभराच्या आसपास साधक असून यापैकी काही साधकांना हृदयविकार, कर्करोग तसेच मानसिक आजार जडले आहेत. त्यांच्यावर आश्रमातील साधक असलेले काही डॉक्टर उपचार करत असून त्यांच्या सल्ल्यानुसार या औषधांची खरेदी करण्यात आली असल्याचा दावाही त्यांनी केला.

सनातन बंदीसाठी अाणखी पुरावे हवेत का: विखे
सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी सरकारला अजून कोणत्या पुराव्यांची गरज आहे असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला अाहे. सीबीआयने उच्च न्यायालयात सादर केलेले पुरावे लक्षात घेता सनातन संस्थेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट होण्याची गरज असून या संस्थेवर तातडीने बंदी घालावी, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. डाॅ. दाभाेलकर, पानसरे यांच्या हत्येनंतर सनातनवर बंदी घालावी अशी मागणी आम्ही करीत होतो. पण काही मंत्री पुरावे देण्याचे कारण देत वेळ मारून नेत होते. त्यामुळेच सनातनचे लाेक सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक यांना धमक्या देत असल्याचे विखे म्हणाले.

आयआरबी कंपनीचीही चौकशी करा : पुनाळेकर
पानसरे यांच्या हत्याप्रकरणी फक्त सनातन संस्थेची चौकशी करण्यात येत आहे. तपास यंत्रणांनी या हत्येबाबतचे इतरही पैलू तपासले पाहिजेत, असे हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव अॅड. संजीव पुनाळेकर म्हणाले. पानसरेंनी टोलच्या मुद्द्यावर आयआरबी कंपनीच्या विरोधात आंदोलने केली होती. तसेच पानसरे हत्येनंतर सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ जमशेद कामा यांनी सनातन संस्थेच्या चौकशीची गरज असल्याचा मुद्दा मांडला होता. या खटल्यासाठी कामा यांच्यासारख्या महागड्या वकिलांना कुणी पैसे दिले याचाही तपास होण्याची गरज असल्याचे पुनाळेकर म्हणाले. ‘पानसरेंच्या हत्येचा आयआरबीशी काही संबंध आहे, असे आपल्याला वाटते का?’ या प्रश्नावर पुनाळेकर यांनी तसा संशय असल्याचे सांगितले. तसेच तपास भलत्याच दिशेला वळवण्याचा हा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...