आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधक पत्नीमुळे सुरू केली ‘सनातनबंदीसाठीची लढाई’, चार वर्षांपूर्वी जनहित याचिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशविघातक कारवाया करत असलेल्या सनातन संस्थेवर बंदी घालावी, अशी मागणी करत विजय नामदेव रोकडे यांनी चार वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेली आहे. विशेष म्हणजे वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अनुभवातून आपल्याला सनातनविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाल्याचे ते सांगतात. २०११ मध्ये दाखल केलेल्या या याचिकेवर दोन वर्षे सुनावणी झाली.
रोकडे यांचा एप्रिल २००७ मध्ये औरंगाबादेतील महिलेशी विवाह झाला. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असलेली ही महिला एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक होती. मात्र विवाहानंतर पती-पत्नीचे नाते पाळण्यास या महिलेने नकार दिला. नवऱ्यासोबत राहणे टाळत त्या अधिकाधिक वेळ सनातन आश्रमात वा घराबाहेर राहू लागल्या. त्यांचे वर्तन विचित्र वाटू लागल्याने रोकडे यांनी खोलात जाऊन चौकशी केली असता आपली पत्नी सनातनच्या साधक असल्याचे कळले. सनातनचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र समोर ठेवून त्या सतत नामजप करीत असत. त्यामुळे सनातन ही नेमकी काय भानगड आहे, याचा सखोल अभ्यास रोकडे यांनी केला. नामजपाच्या वा साधनेच्या नावाखाली सनातनतर्फे संमोहनाचा वापर केला जातोय आणि मेंदू ताब्यात घेऊन त्यांना मानवी रोबोट केले जात आहे. साधकांच्या नकळत अध्यात्माच्या नावाखाली संमोहनाचा वापर केला जात असल्याचे लक्षात आल्याने केवळ आपलेच नव्हे तर भविष्यात अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त होतील, हे लक्षात आल्याने रोकडे यांनी सनातनविरुद्ध लढा सुरू केला.
पुस्तक न्यूयॉर्कहून
सनातन संमोहनशास्त्राचा गैरवापर करीत आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी एमडी मानसोपचार या अभ्यासक्रमात शिकवल्या जाणाऱ्या पुस्तकांचा अभ्यास केला. क्रासिलनेक या प्रसिद्ध लेखकाचे या विषयातील पुस्तक भारतात उपलब्ध नसल्याने त्यांनी ते न्यूयॉर्कहून मागवले.

हिंसेचे समर्थन
रोकडे यांनी याचिकेत "सनातन प्रभात' वर्तमानपत्रात व सनातन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या क्षात्रधर्म, स्वभावदोष निर्मूलन, संमोहनशास्त्र या पुस्तकांमधील लेखांचा संदर्भ दिला आहे. या लेखांमध्ये हिंदू धर्मद्रोही, भ्रष्ट राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, पोलिस हे दुर्जन असून त्यांचा नाशच करायला हवा, असे तत्त्वज्ञान मांडले असल्याचे रोकडे म्हणाले.
काडीमोड घेतला
पती-पत्नी नाते मान्य नसणाऱ्या व्यक्तीने विवाह करून आपली फसवणूक केली असल्याने हा विवाह रद्द केला जावा, अशी याचिका रोकडे यांनी दाखल केली. त्यांच्या पत्नीच्या बाजूने सनातन संस्था उभी असल्याने रोकडेंचा खटला लढायला वकीलही तयार होत नव्हते. अखेर सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन रोकडे यांनी काडीमोड करून घेतला.