आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sand Evcuation Again Starts; Rane, Tope, Bhujbal Insisted

वाळू उपशावरील बंदी उठवा; राणे, टोपे, भुजबळांचा आग्रह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पाच हेक्टरपेक्षा कमी जागेत वाळू उत्खनन करण्यास बंदी असल्याने राज्यातील अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत पडलेले आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार ही बंदी हटवण्यासाठी अध्यादेश आणण्याचा विचार करत आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी वाळू उपशाचा मुद्दा उपस्थित केला होता.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी बुधवारच्या बैठकीत एकमुखाने वाळू उत्खननावर घातलेली बंदी उठवण्याची मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली. पाच हेक्टरपर्यंतच्या जागेवर उत्खनन करण्यास सध्या बंदी आहे. मात्र कायद्याने बंदी असल्याने वाळू चोरीचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे त्याचे भावही प्रचंड वाढलेले आहेत. तसेच सध्या अनेक कामे रेतीअभावी बंद पडलेली आहेत.


मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत विचार करण्याचे आश्वासन देऊन महसूल आणि वन सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना तसा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत. मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात येणार असून त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.


बिल्डर लॉबीचा दबाव ?
वाळूअभावी राज्यात अनेक मोठमोठे प्रकल्प रखडले आहेत. त्यात अनेक बड्या बिल्डरांचे पैसे अडकले आहेत. त्यामुळे बिल्डरलॉबीच्या दबावाखाली काही मंत्री ही बंदी उठविण्यासाठी प्रयत्न करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


जयदत्त क्षीरसागर, सतेज पाटीलही आग्रही
राजस्थान सरकारने कायदा मंजूर करून पाच हेक्टरपेक्षा कमी जागेतून रेती उत्खनन करण्याची परवानगी दिली आहे. महाराष्ट्र सरकारनेही याबाबत कायदा तयार करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे, सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही राणेंच्या मागणीला पाठिंबा दिल्याचे सूत्रांनी सांगितले.