आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sangeet Rangbhumi's Bhalchandra Pendharkar Life Story

अल्पपरिचय: संगीत रंगभूमीचे अाधारवड : भालचंद्र पेंढारकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक संगीत नाटकात भालचंद्र पेंढारकर - Divya Marathi
एक संगीत नाटकात भालचंद्र पेंढारकर
मुंबई - भालचंद्र व्यंकटेश पेंढारकर ऊर्फ "अण्णा' यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९२१ रोजी झाला होता. ललितकलादर्श या नाट्यक्षेत्रातील प्रतिष्ठित संस्थेचे प्रमुख या नात्याने त्यांनी अनेक संगीत नाटके रंगभूमीवर सादर केली. त्यात "संगीत सौभद्र'सारखी पूर्वी गाजलेली नाटके होतीच शिवाय "पंडितराज जगन्नाथ', "दुरितांचे तिमिर जावाे', "बावनखणी', "जय जय गौरीशंकर', "आनंदी गोपाळ' या नव्या नाटकांचाही समावेश होता. अभिनयासोबतच दिग्दर्शन, नेपथ्य, छायाचित्रण, नाट्य निर्मिती अशा अनेक क्षेत्रांत पेंढारकर लीलया वावरले.
अत्यंत शिस्तबद्ध निर्माते, कलाकार म्हणूनही पेंढारकर यांची ख्याती होती. गिरगावच्या साहित्य संघातील त्यांचा वावर अनेक कलावंतांना मार्गदर्शक ठरला. अनेकदा नाट्यनिर्माते, कलाकार वेगवेगळी नाटके सादर करतात. पण या नाटकांचे दस्तऐवजीकरण करण्याची, त्यांचे रेकॉर्डिंग करून ठेवण्याची दक्षता खूपच कमी निर्माते दाखवतात. भालचंद्र पेंढारकरांची साहित्य संघात स्वत:ची रेकॉर्ड रूम होती. त्यांनी प्रायोगिकपासून ते व्यावसायिकपर्यंतच्या सुमारे २५० नाटकांचे रेकॉर्डिंग करून ठेवले होते. या नाटकांची असंख्य छायाचित्रे जतन करून ठेवली होती. हा ठेवा आता मराठी रंगभूमीचा अभ्यास करणाऱ्यांना तसेच पुढच्या पिढीसाठी मोलाचा ठरत आहे.
पेंढारकर यांनी संगीत, गद्य अशा सुमारे ५१ नाटकांमध्ये भूमिका केली होती. त्यांनी ललितकलादर्श संस्थेमार्फत १४ नाटकांची निर्मिती केली. विजय तेंडुलकर लिखित "झाला अनंत हनुमंत', भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवरील "रक्त नको मज प्रेम हवे' हे सुरेश खरे लिखित नाटक तसेच डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावरील "आनंदी-गोपाळ' ही त्यातील काही प्रमुख नाटके होती. पेंढारकर यांच्यावर ग्वाल्हेर गायकीचे संस्कार झाले होते. "आई तुझी आठवण येते', "जय जय गौरीशंकर' नाटकातील "रमारमण श्रीरंग' ही त्यांच्या संगीत नाटकातील पदे अतिशय लोकप्रिय झाली. १९५५ मध्ये प्रदर्शित "अमर भूपाळी' चित्रपटात होनाजी यांची भूमिका पंडित नगरकर तर बाळा यांची
भूमिका भालचंद्र पेंढारकर यांनी केली होती. पेंढारकर यांचा संगीत, नाटक यांचा वारसा त्यांचे पुत्र ज्ञानेश पेंढारकर व स्नुषा नीलाक्षी पेंढारकर समर्थपणे पुढे चालवत आहेत. ज्ञानेश पेंढारकर हे स्वत: उत्तम संगीतकार व संगीत गायकनट आहेत.
गाजलेली नाटके
{ शाब्बास बिरबल शाब्बास
{ गीता गाती ज्ञानेश्वर
{ पंडितराज जगन्नाथ
{ दुरितांचे तिमिर जावाे
पुरस्कार
{ विष्णुदास भावे पुरस्कार १९७३
{ बालगंधर्व पुरस्कार १९८३
{ केशवराव भोसले पुरस्कार १९९०,
{ जागतिक मराठी परिषद, १९९६,
{ संगीत नाटक कला अकादमी २००४
{ तन्वीर पुरस्कार २००५,
{ चतुरंग जीवनगौरव पुरस्कार २००६