आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळसूत्र विकून शौचालय बांधणा-या संगीताचा पंकजांकडून मंगळसूत्र देऊन सत्कार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- उघड्यावर शौचाला बसावे लागत असल्याने रोजच होणा-या कुचंबणेला व मानसिक त्रासाला कंटाळलेल्या वाशिम जिल्ह्यातील सायखेडा गावातील संगीता आव्हाळे या महिलेने स्वत:च्या गळ्यातील मंगळसूत्र विकून शौचालय बांधले. तिच्या या धाडसी निर्णयामुळे राज्याच्या ग्रामीणविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी संगीताचा आज मुंबईत सत्कार केला. पंकजा मुंडे यांनी स्वत:च्या पैशाने मंगळसूत्र खरेदी करून तिला भेट म्हणून देत सत्कार केला. संगीताच्या पतीने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातले. मी जे भोगले ते माझ्या मुलीला भोगावे लागू नये यासाठी मी पतीकडे शौचालय बांधण्याची मागणी केली. मात्र, आर्थिक चणचणीमुळे वारंवार मागणी करुनही पतीने माझ्या मागणीकडे दुर्लक्ष केले. अखेर मी मंगळसूत्रासह इतर दागिने विकून शौचालय बांधण्याचा निर्णय घेतल्याचे सत्कारप्रसंगी संगीताने सांगितले. संगीता आव्हाळे यांच्या धाडसाचे संपूर्ण राज्यात कौतूक होत आहे.
ग्रामीण भागात शौचालयांची संख्या नगण्य असते. सुशिक्षित व सधन कुटुंबातील लोकच शौचालय बांधतात. ग्रामीण भागात शौचालय नसल्यामुळे महिलांसह सर्वांनाच उघड्यावर शौचास बसावे लागते. यात महिलांची विशेषत कुचंबणा होते. शरमेने अनेक महिला दिवसा शौचास जाण्यास टाळतात. त्यामुळे वेगवेगळे आजाराच्या व्याधी होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे ग्रामीण भागात अनेकांना त्रासांना सामोरे जावे लागते. राज्यात जास्तीत जास्त कुटुंबियांनी शौचालये बांधावीत यासाठी राज्य सरकारकडून अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत. शौचालय बांधण्यासाठी विविध प्रकारचे अनुदान देण्यात येत आहे. तरीही काही नागरिक शौचालय बांधण्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. याला आर्थिक चणचण व उदासीनता ही प्रमुख दोन कारणे आढळून येतात.
संगीता या फारशा शिकलेल्या नाहीत. त्यांना एक 11 वर्षाची मुलगीही आहे. संगीताच्या आई-वडिलांच्या घरी शौचालय होते. मात्र सासरी नव्हते त्यामुळे लग्न झाल्यापासून संगीताला उघड्यावरच शौचास जात होत्या. रस्त्याने एखादी गाडी आली तर उठायचं अन् पुन्हा बसायचं... सतत ऊठबस करत एक तास शौचासाठी ताटकळत थांबायचं. या उठाबशा तिच्यासाठी शारीरिकच नव्हे तर मानसिक वेदनादायी होत्या. अखेर संगीताने घरीच शौचालय बांधण्याची पती व सासरच्या मंडळींकडे मागणी केली. मात्र पैशाचे कारण देत तिची मागणी दुर्लक्षित करण्यात आली. संगीताने वारंवार मागणी केली, मात्र पैशाचे कारण देत पतीने ती उडवून लावली. ‘गावातील इतर महिला उघड्यावर जातातच ना,’ असे उत्तरही तिला ऐकावे लागले. त्यामुळे संगीता निराश झाली. परंतु तिने धीर सोडला नाही.
घर बांधताना एक खोली कमी बांधा, पण शौचालय आधी बांधा, असा लकडा तिने लावूनच धरला. मात्र पती व सासरच्यांनी तिच्या मागणीला भीक घातली नाही. शौचालयासाठी पैसे नाहीत असे उत्तर देणा-या पुरुषी मानसिकतेविरोधात संगीताने बंड पुकारले. परंतु एवढ्यावरच न थांबता तिने चक्क सौभाग्याचं लेणं असलेलं मंगळसूत्र परस्पर विकून तिने घरात शौचालय बांधण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यामुळे काही दिवस सासरच्या मंडळींनी संगीतासोबत अबोला धरला होता. अखेर तिने स्वत:चे मंगळसूत्र कुटुंबीयांच्या परस्पर विकून शौचालय बांधले. तिच्या या धाडसी निर्णयाने महिलांना सक्तीने उघड्यावर शौचास जाण्यास बाध्य करणा-या पुरुषी मानसिकतेला आव्हान दिले. मात्र काही दिवसांतच तिचा निर्णय त्यांना पटला. आता घरातील सर्वच लोक शौचालयाचा वापर करतात. तिच्या या धाडसी निर्णयामुळे ग्रामीण भागातील सर्व महिलांसमोर एक आदर्श निर्माण झाला आहे.
पुढे पाहा या सत्कार समारंभाची छायाचित्रे....