मुंबई - चित्रपटसृष्टीत पदार्पण करणा-या कलाकाराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यास कलेचे यथायोग्य शिक्षण व कलासामग्री मिळणे गरजेचे आहे. त्यामुळेच दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासारख्या संस्थेची मुंबईत आम्ही शाखा स्थापन करणार आहोत, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी केली. मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण व चित्रकर्मी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते.
या सोहळ्यात ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व पत्रकार इसाक मुजावर यांना देवतळे यांच्या हस्ते चित्रभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 51 हजार रुपये रोख, मानचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत या समारंभास अनुपस्थित असल्याने त्यांना हा पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय चित्रकर्मी पुरस्काराचेदेखील या वेळी वितरण झाले. ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांच्या मुलाने हा पुरस्कार स्वीकारला, तर रामचंद्र कांबळे, मधुकर देशपांडे, जयमाला काळे, शरद चव्हाण, मधू गायकवाड, अप्पा मुल्ला, विलास मोरबाळे यांच्यासह 21 तंत्रज्ञ व निर्मात्यांनादेखील पुरस्काराने गौरवण्यात आले.
या पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल, निर्माते ए. कृष्णमूर्ती, भरत जाधव, महेश कोठारे, संदीप कुलकर्णी, सचिन पिळगावकर, वर्षा उसगावकर, ज्येष्ठ अभिनेते रणजित, दूरदर्शनचे मुकेश शर्मा आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तारकांच्या नृत्याने धमाल
या कार्यक्रमात ऊर्मिला कानेटकर, नकुल घाणेकर, तेजा देवकर, धवल चांदवडकर, राहुल सक्सेना आदी कलाकारांनी नृत्य, लावणी, गायनाच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन केले. याप्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके, उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, किरण शांताराम, विजय पाटकर, अलका कुबल, प्रिया बेर्डे, नयना आपटे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन समीरा गुजर-जोशी आणि पुष्कर श्रोत्री यांनी केले.