आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Dutt To Be Released On February 27, Divya Marathi

सरकारच्या ‘कृपे’ने संजय दत्त फेब्रुवारी अखेरीस तुरुंगाबाहेर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांतील अाराेपींकडून बेकायदा शस्त्र मिळवून ते बाळगल्याबद्दल शिक्षा होऊन सध्या पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात असलेला बाॅलीवूडचा अभिनेता संजय दत्त पुढील महिन्याच्या अखेरीस आपली शिक्षा संपवून घरी परतण्याची शक्यता आहे.

शिक्षेच्या काळात तुरुंगातील चांगल्या वर्तणुकीमुळे त्याच्या शिक्षेत सूट मिळण्याच्या प्रस्तावाला गृह विभागाने मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या निर्णयानंतर होणाऱ्या टीकेच्या भीतीने सरकारने मात्र कानावर हात ठेवले अाहेत. तर कारागृह विभागाने मात्र अद्याप याबाबत काेणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील शिक्षेविरोधात केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर मे २०१३ मध्ये उर्वरित ४२ महिन्यांची शिक्षा भोगण्यासाठी संजय दत्तची रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात करण्यात आली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यापैकी १८ महिन्यांची शिक्षा त्याने १९९६ मध्ये अटकेत असताना पूर्ण केली होती. आपल्या उर्वरित शिक्षेदरम्यान संजय दत्तला प्रत्येकी दोन वेळा पॅरोल आणि फर्लोवर तुरुंगाबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली होती. या संपूर्ण शिक्षेदरम्यान संजय दत्तची तुरुंगातील वर्तणूक चांगली असल्याने त्याला शिक्षेतून सूट मिळावी, असा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवत सरकारने हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवल्याचे कळते. या प्रस्तावानुसार त्याला १०७ दिवस म्हणजे तब्बल साडेतीन महिन्यांची सूट मिळणार आहे. तसे झाल्यास २५ फेब्रुवारीला संजय दत्त तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे. मात्र, असा कोणताही निर्णय गृह विभागाने घेतला नसल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली. याबाबत अधिक विचारले असता, ‘तुरुंग प्रशासनाने नियमावलीनुसार तसा काही निर्णय घेतला असल्यास आपणास कल्पना नाही,’ असे पाटील म्हणाले.

शिक्षे दरम्यान कैद्याला वर्षातून ८४ दिवसांची सूट मिळते. उत्तम वर्तणूक असल्यास या ८४ दिवसांव्यतिरिक्त आणखी ३० दिवसांची विशेष सूट मिळते. तसेच तुरुंग प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आपल्या अधिकारात एखाद्या कैद्याची शिक्षा आणखी जवळपास ९० दिवस कमी करू शकतात. या सर्व तरतुदींचा लाभ संजय दत्तला मिळणार अाहे. मात्र, सन २०१४ मध्ये डिसेंबर महिन्यात १४ दिवसांच्या फर्लो रजेवर असताना तुरुंगात परतण्यास संजय दत्तने दोन दिवसांचा विलंब लावल्याने त्याला शिक्षेत सूट द्यावी किंवा नाही याबाबत सरकारी पातळीवर विचार होत होता. अखेर त्या विलंबाला संजय दत्त जबाबदार नसल्याचे तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केल्यानंतर सूट देण्याचा प्रस्ताव मार्गी लागल्याची माहिती अाहे.

सुट्यांचा घटनाक्रम
२०१३ मार्च : संजय दत्तचे अपील फेटाळत उच्च न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवत शरण येण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
२०१३ ऑक्टोबर : फर्लोवर १४ दिवसांची सुटी, विनंतीनंतर सुटीत आणखी १४ दिवसांची वाढ
२०१३ डिसेंबर : पॅरोलवर २८ दिवसांची सुटी, पत्नीच्या आजारपणास्तव आणखी २८ दिवसांची सुटी वाढवली.
२०१५ ऑगस्ट : मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी दिवसांची विशेष रजा