आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण नको रे बाबा !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राजकारणात येऊ नकोस, असे अमरसिंह मला सतत सांगत होते, मात्र मला या क्षेत्राचे फार आकर्षण होते. त्यामुळेच समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांना गळ घालून मी राजकारणात एंट्री केली. मात्र तो माझा प्रांत नसल्याची जाणीवही लवकरच झाली, अशी कबुली बॉलीवूडचा ‘खलनायक’ संजय दत्तने खास ‘दिव्य मराठी’ला मुलाखतीत दिली.
संजय दत्तचा ‘अग्निपथ’ 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने संजयने ‘रॉकी’पासून सुरू झालेल्या प्रवासापासून आई-वडिलांचा असलेला प्रभाव अशा सगळ्या गोष्टींबाबत तासभर गप्पा मारल्या. तो म्हणाला, मी बॉलीवूडचा खूप आभारी आहे. मी ज्या स्थितीतून गेलो त्या स्थितीत दुसरा कोणी असता तर उद्ध्वस्त झाला असता; परंतु बॉलीवूडमधील सगळ्यांनी मला खूपच सांभाळून घेतले. प्रत्येक वेळी ते माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्यामुळेच मी पुन्हा उभा राहू शकलो. प्रेक्षकांनीही माझ्यावर प्रचंड प्रेम केले. त्यांचा मी ऋणी राहील. हे ऋण फेडता येणे मला शक्य नाही.
प्रेक्षकांचे माझ्यावर प्रचंड प्रेम होते. मला ते प्रेम पाहायचे होते आणि म्हणूनच मी राजकारणात येण्याचे ठरवले होते. अमर सिंह माझे चांगले मित्र आहेत. राजकारणात येण्यासाठी मी त्यांच्याकडे सतत आग्रह धरत होतो. मात्र ते तयार नव्हते. ‘राजकारण तुझा पिंड नाही त्यामुळे तू राजकारणात येऊ नकोस,’ अशा शब्दात ते माझी समजूत काढायचे. मात्र माझा निर्णय पक्का होता. त्यामुळे मी मुलायम सिंह यांनाच गळ घातली. माझी तीव्र इच्छा पाहून त्यांनी मला संधी दिली, परंतु लवकरच कळून चुकले की, राजकारण माझा प्रांत नाही. मला भाषण करता येत नाही हे त्यामागील मुख्य कारण... डायलॉग वेगळे आणि लाखोंच्या जनसमुदायासमोर बोलणे वेगळे, याची खात्री पटली. चूक उमगताच राजकारणातून बाजूला झालो. आत पुन्हा कधीही मी राजकारणात पडणार नसल्याचे त्याने सांगितले.