आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..अन् काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तावडीतून निरुपम बचावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काँग्रेस दर्शन मासिकामधून जवाहरलाल नेहरू, सोनिया गांधीवर झालेल्या टीकेमुळे या मासिकाचे संपादक तसेच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर सध्या मुंबई काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते खूप संतप्त असून त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविण्यासाठी जमलेल्या या लोकांपासून सुटका करण्यासाठी पटाणकोट हल्ल्याच्या निमित्ताचा "कोट' निरुपम यांनी केला आणि स्वत:ची अब्रू वाचवली.

मुंबई प्रदेश कार्यालयातील कार्यक्रमानिमित्त निरुपम यांना धारेवर धरण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले होते. मात्र, पठाणकोटला शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्याचे निमित्त शोधून कार्यक्रम आटोपता घेण्यात आला आणि कार्यकर्त्यांच्या हल्लाबोलमधून निरुपम थोडक्यात बचावले, असे चित्र दिसले.

विधान परिषदेवर निवडून आलेल्या भाई जगताप यांचा सत्कार समारंभ शनिवारी मुंबई प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या वेळी निरुपम यांचे विरोधक गुरुदास कामत, कृपाशंकर सिंह, नसीम खान, राजहंस सिंग, बाबा सिद्दीकी, मिलिंद देवरा, जनार्दन चांदूरकर असे झाडून सारे काँग्रेस नेते आपल्या समर्थकांसह हजर होते. निरुमप यांना मानणारे कार्यकर्तेही या वेळी हजर होते. पण, विरोधकांची संख्या जास्त होती. यामुळे या कार्यक्रमात निरुपम यांना जाब विचारला जाणार आणि निरुपम विरुद्ध कामत गटाच्या कार्यकर्त्यांची जोरात बाचाबाची होईल, अशी परिस्थिती होती.

निरुपम यांनी या परिस्थितीचा अंदाज घेऊन पठाणकोट घटनेचे निमित्त उपस्थित केले. जवान शहीद होत असताना सत्कार कार्यक्रम ठेवणे उचित ठरणार नाही. शोक प्रस्ताव मांडून त्यांनी कार्यक्रम आटोपता घेतला आणि विरोधकांचा हल्लाबोल परतवला. अचानकच्या शोक प्रस्तावामुळे कामत गटाला शांत राहण्यावाचून पर्याय उरला नाही.

निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करा : खान
दोन दिवसांपूर्वी पश्चिम उपनगर जिल्हा काँग्रेसची बैठक कामत यांनी गोरेगावमध्ये आयोजित केली होती. या बैठकीला निरुपम सोडून बाब सिद्दीकी, राजहंस सिंग, नसीन खान, कृपाशंकर सिंह हे उपस्थित होते. या वेळी काँग्रेस नेतृत्वावरील टीकेला जबाबदार असलेल्या निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करा, अशी मागणी माजी मंत्री नसीम खान यांनी केली. तर माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी अपमान सहन करणार नाही, अशी भूमिका घेतली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कानावर निरुपम यांच्या कारवाया घालण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

राणे, निरुपमांना काँग्रेस कळली नाही!
शिवसेनेमधून काँग्रेसमध्ये आलेल्या माजी मंत्री नारायण राणे तसेच संजय निरुपम यांना काँग्रेस संस्कृती काय असते, पक्षात कशाप्रकारे काम कराचे हे अद्याप कळलेले नाही. त्यामुळे आजही हे दोन्ही नेते शरीराने जरी काँग्रेसमध्ये असले तरी मनाने ते अजूनही शिवसेनेत असल्यासारखे वागत बोलत आहेत. काँग्रेस पक्षासाठी ही अजिबात चांगली गोष्ट नाही. पक्षनेतृत्वाने अशा लोकांचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असा सूर गोरेगावमध्ये काँग्रेस नेत्यांनी लावला.
बातम्या आणखी आहेत...