आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामतांचे मन वळवून संजय निरुपमांना लगाम, वरिष्ठ नाराज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नाराज माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांचे मन वळवून संजय निरुपम यांना लगाम लावण्यास सुरुवात केली आहे. याच कारणास्तव कामत यांनी गुरुवारी नव्याने गुजरात, राजस्थान, दादरा नगर हवेली, दमण व दीव या आपल्या प्रभारी राज्यांतील लोकांच्या भेटीगाठी घेण्याची घोषणा केली. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे सांगितले.

पाच वेळेस मुंबईहून खासदार झालेले माजी केंद्रीय मंत्री कामत यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. यासंबंधीचे पत्र त्यांनी सोनिया आणि राहुल यांना लिहिले होते. मात्र, त्यास कोणतेही उत्तर मिळाले नसल्याने कामत यांनी ६ जून रोजी पक्ष सोडण्याची इच्छा जाहीर केली आणि पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला होता. यासोबत त्यांनी वैयक्तिक कारणास्तव सक्रिय राजकारणातून संन्यास घेणार असल्याचेही सांगितले. मात्र, आता त्यांनी आपला निर्णय मागे घेतला. कामत म्हणाले, मी २४ जूनपासून आपल्या प्रभारी राज्यांतील लोकांची भेट घेण्यास सुरुवात करेन.

निरुपम यांचे पंख छाटल्याची चर्चा
गुरुदास कामत काँग्रेस सरचिटणीसपदी कायम राहिल्यानंतर माजी खासदार संजय निरुपम यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून लवकरच उचलबांगडी होईल, असे मानले जाते. काँग्रेसची मुंबई शाखा शिवसेना शैलीत चालवल्यामुळे माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड वगळता बहुतांश वरिष्ठ नेते निरुपम यांच्यावर नाराज आहेत. निरुपम गटाचे कार्यकर्ते मात्र राहुल गांधी अद्यापही निरुपम यांच्या बाजूने असल्याचे मानतात.
बातम्या आणखी आहेत...