आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DM ANALYSIS: राजकीय ‘भूकंपा’चे इशारे शिवसेनेला पेलवतील का? कर्जमाफीबाबतही दुविधा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ या जुन्या म्हणीचा अनुभव सध्या महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपला येत आहे. सत्तेत सहभागी असतानाही शिवसेनेने जैतापूरपासून शेतकरी कर्जमाफी, मेट्रो, बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग अशा सर्वच मुद्द्यांवर मित्रपक्ष भाजपला टाेकाचा विरोध करण्याचे काम सुरू केले आहे. एवढेच नव्हे तर अधूनमधून सत्ता सोडण्याची वक्तव्येही केली जात आहेत. अाता तर शेतकरी कर्जमाफीवरून दाेन्ही पक्षांमध्ये टाेकाचे मतभेद असताना शनिवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘जुलैमध्ये राजकीय भूकंप होईल’ असे भाकीत करून राज्यात मध्यावधी निवडणुका हाेणार असल्याचे पुन्हा एकदा संकेत दिले अाहेत. भाजपकडून सरकारमध्ये दुय्यम स्थान मिळाल्याने नाराज असलेल्या शिवसेनेचा हा खटाटाेप राज्यात जनाधार वाढवण्यासाठीच असल्याचे अाता लपून राहिलेले नाही.
 
महाराष्ट्रात यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जोरदार टक्कर देण्याची ताकद फक्त शिवसेनेतच होती. २०१४ पर्यंत भाजप शिवसेनेचे बाेट धरूनच राज्यात माेठा हाेत हाेता. मात्र, लाेकसभा निवडणुकीपासून नरेंद्र मोदी यांच्या झंझावाताने महाराष्ट्रात भाजपला जणू ‘हत्तीचेच बळ’ मिळाले आणि या पक्षाने जिल्हा परिषदेपासून महापालिकांपर्यंत जाेरदार मुसंडी मारली. या लाटेत शिवसेना वाहून गेली नसली तरी ‘माेठा भाऊ’ हा मान मात्र त्यांनी गमावला. विधानसभेला स्वबळावर लढवून, माेदी लाटेतही ६३ अामदार निवडून अाणलेल्या शिवसेनेला नंतर मात्र राज्यात फारसा प्रभाव पाडता अाला नाही. भाजप सरकारनेही त्यांना सरकारमध्ये दुय्यम स्थान दिले. त्यामुळे शिवसेनेचे नेते कार्यकर्ते सत्तेत असूनही प्रचंड निराश अाहेत. अधूनमधून सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारेही त्यांच्याकडून दिले जात अाहेत.
 
लातूर आणि पनवेल मनपा निवडणुकीत शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. मागील मनपा निवडणुकीत परभणी, भिवंडी, पनवेल, लातूर या शहरांमध्ये त्यांची ताकद भाजपपेक्षा जास्त होती. परंतु भाजपने यंदा मात्र शिवसेनेला मागे टाकून धक्का दिला. एवढेच नव्हे तर बालेकिल्ला असलेल्या मराठवाड्यातही शिवसेनेला भाजपने मागे टाकले. भिवंडी महानगरपालिकेत शिवसेनेचे वर्चस्व असायचे, त्यामुळे त्यांचाच महापौर होत असे. परंतु या वेळी काँग्रेसने ९० पैकी ४७ जागा जिंकून बहुमत प्राप्त केले आणि भाजप १९ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आला. लातूरमध्ये शून्य असलेल्या भाजपने थेट सत्ता प्राप्त केली तर शिवसेना शून्यावर गेली. औरंगाबाद, परभणीतही भाजपने शिवसेनेवर मात केली. मराठवाड्यात मागे पडणे हे शिवसेनेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. वास्तविक शिवसेनेच्या ६३ आमदारांपैकी जास्तीत जास्त आमदार ग्रामीण भागातील आहेत. असे असतानाही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची पीछेहाट झाली. या अपयशाच्या नैराश्यातूनच शिवसेनेने भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
 
भाजपची घाेडदाैड थांबवून राज्यात पुन्हा ‘माेठा भाऊ’ व्हायचे असेल तर जनतेत विश्वास निर्माण करावा लागेल, हे लक्षात आल्याने शिवसेना नेत्यांनी सत्तेत असूनही विरोधकाची भूमिका बजावणे सुरू केले. प्रथम जैतापूर अणुप्रकल्पाला विरोध केला. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्यास सुरुवात केली. राज्यातील सरकारवर टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीपासून भाजपच्या सर्वच योजनांवरही कधी मुखपत्रातून तर कधी थेट टीका करण्यास सुरुवात केली. अाताही सरसकट कर्जमाफीचा मुद्दा हाती घेऊन शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. आम्हाला सत्तेची हाव नाही, असे सांगताना शिवसेना सत्तेशिवाय राहू शकत नाही, असेच चित्र या पक्षाच्या नेत्यांच्या वागण्यातून जनतेला दिसून अाले. मध्यावधीची शक्यता दिसताच राज्यात ताकद वाढवण्यासाठी शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने राज्यभरात शिवसेनेचे मंत्री, आमदारांचे दौरेही सुरू करण्यात आले आहेत. परंतु खिशात राजीनामे घेऊन फिरण्याच्या वल्गना करणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे खिशातच राहिले, हा दुटप्पीपणाही जनतेपासून लपून राहिला नाही.
 
कर्जमाफीबाबत द्विधा
मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांची प्रशंसा केली. मात्र, याची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत त्यांना समज दिली आणि प्रवक्ते संजय राऊतच शिवसेनेची अधिकृत भूमिका मांडतील, असे सांगितले. त्यामुळे शिवसेनेचे अन्य नेते आता गप्प बसले असून राऊतच भूकंपाची भविष्यवाणी करू लागलेले आहेत. शिवसेनेला ही नवी वाटचाल कितपत यश देईल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
बातम्या आणखी आहेत...