आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तुह्या धर्म कोंचा'ची वेगळी वाट; आदिवासींच्या जीवनावरील चित्रपट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'गाभ्रीचा पाऊस'सारखा वेगळ्या धाटणीचा चित्रपट केल्यानंतर दिग्दर्शक सतीश मनवर पुन्हा एकदा हटके विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'तुह्या धर्म कोंचा' या आदिवासी कुटुंबावर आधारित चित्रपटाने सर्वांची मने जिंकली आहेत. वेगळी कथा असलेल्या या चित्रपटात सामाजिक संदेशही आहे.

देशाने कितीही प्रगती केली असली तरी आदिवासी भागात आजही लोकांना जागाची काहीही माहिती नसते. नेमका हाच धागा पकडून एक वेगळी कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. आदिवासी लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिश्चन आणि हिंदू धर्मातील पुढारलेले नेते या लोकांचा कसा फायदा घेतात याचे चित्रण मनवर यांनी जगासमोर मांडले आहे. देशात आज अनेक असे लोक आहेत की, ज्यांना दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी धर्मांतरासारखे कठोर पाऊल उचलावे लागते. 'तुह्या धर्म कोंचा'मध्ये नेमका हाच आशय आहे.

आर्थिक विवंचनेत सापडलेल्या एका आदिवासी कुटुंबावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. चित्रपटात मुख्य भूमिका अभिनेता उपेंद्र लिमये याने साकारली आहे. हे पात्र रंगवण्याआधी त्याने आदिवासी लोक कसे राहतात याचा बारकाईने अभ्यास केल्याने त्याच्या पात्राला वेगळीच रंगत आली आहे. तसेच त्याला तितक्याच ताकदीने मोलाची साथ दिली आहे ती अभिनेत्री विभावरी देशपांडेने. किशोर कदम यानेही फादरची भूमिका योग्य पद्धतीने केली आहे. एकूणच सतीश मनवरचा हा चित्रपट सर्वांना एक सामाजिक संदेश देऊन जातो.

अहिराणीचा प्रभावी वापर- 'तुह्या धर्म कोंचा' या चित्रपटात प्रामुख्याने अहिराणी भाषा वापरण्यात आली आहे. उपेंद्र, विभावरी आणि किशोर कदम यांनी या भाषेचा प्रभावीपणे वापर केला आहे. त्यामुळेच सध्या या चित्रपटाची तुलना ही 'जैत रे जैत' या चित्रपटाशी होत असल्याचे समीक्षकांना वाटते.