आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satyajeet Gaikawad Contest Loksabha From Dhule On Sp\'s Ticket

बडोद्याचे संस्थानिक सत्यजित गायकवाड धुळ्यातून \'सपा\'कडून लढणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बडोद्याचे संस्थानिक व माजी खासदार सत्यजित गायकवाड हे धुळे लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविणार आहेत. गायकवाड हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र, काँग्रेसने आमदार अमरिशभाई पटेल यांना तिकीट दिल्याने गायकवाड नाराज झाले आहेत. काँग्रेसने पक्षाने आपल्याला तिकीटासाठी शब्द दिला होता. मात्र, पटेल यांना तिकीट दिल्याने आपल्याकडे इतर पक्ष किंवा अपक्ष म्हणून लढण्याखेरीज पर्याय राहिलेला नाही असे गायकवाड यांनी म्हटले होते. अखेर सपाने त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. 2009 साली गायकवाड यांनी काँग्रेसच्या तिकीटावर बडोद्यातून लोकसभा लढवली होती. मात्र त्याचा पराभव झाला होता.
गायकवाड म्हणाले, आपले मूळ घराणे मालेगाव तालुक्यातील कवळाणेचे आहे तेथे आमच्या पणजोबांचा राजवाडा आडही आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी नेहमीच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेला चालना दिली आहे. धुळ्यातील काही विधानसभा मतदारसंघात आपला जनसंपर्क आहे. येथील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना मी भेटत असतो. पक्षाने मला तिकीट देण्याबाबत सकारात्मक विचार सुरु होता. मात्र अचानक तिकीट नाकारले गेले. मात्र, आपण निवडणूक लढविणार आहोत असे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, गायकवाड यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसच्या अडचणीत भर पडली आहे. मात्र, काँग्रेसने पटेल यांना उमेदवारी देताना निवडून येण्याची क्षमता हाच निकष लावल्याचे सांगण्यात येते. पटेल मागील वेळी अल्पशा मताने पराभूत झाले होते. आता त्यांना निवडून येण्याची मोठी संधी असल्याचे काँग्रेसला वाटते. त्यामुळे त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. असे असले तरी गायकवाड यांनी सपाकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस पक्षाच्या अडचणीत भर पडली आहे.
धुळे व मालेगाव परिसरात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सपाचे नेते अबू आझमी येथून लोकसभा लढविणार असल्याची चर्चा होती. त्यासाठी त्यांनी गेली काही दिवस चाचपणी केल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, काही आठवड्यापूर्वी आझमी यांनी मालेगाव येथे सत्यजित गायकवाड यांची भेट घेतली होती. त्यावेळी तिकीट कापल्याने नाराज झालेले गायकवाड विचारमंथन करीत होते. त्याचवेळी आझमींनी ऑफर दिल्याने गायकवाड यांनी लढण्याचा येथून निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.