आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपालसिंह भाजपच्या वाटेवर, नोकरीला ठोकणार रामराम?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपालसिंह नोकरीला रामराम ठोकून राजकीय करिअरला सुरवात करणार असल्याचे वृत्त आहे. भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह आणि सत्यपालसिंह यांच्या गेल्या काही दिवसांमध्ये अनेक भेटी झाल्या असून उत्तर प्रदेशातील बागपत किंवा मेरठ या मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचे समजते.
भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी आणि विद्यमान अध्यक्ष राजनाथसिंह यांच्यासोबत सत्यपालसिंह यांच्या अनेक भेटी झाल्या आहेत. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हेही सत्यपाल यांच्या उमेदवारीस अनुकूल असून त्यांनी उत्तर प्रदेशातील भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आणि विश्वासू सहकारी अमित शहा यांना सत्यपालसिंह यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
नागपूर, पुणे, मुंबई या महानगरातील पोलिस आयुक्तपदांवर राहिलेल्या सत्यपालसिंह यांनी महाराष्ट्र पोलिस दलात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. येत्या दोन वर्षांत ते निवृत्त होणार आहेत. इशरत जहॉं चकमक प्रकरणी उच्च न्यायालयाने नेमलेल्या चौकशी समितीचे प्रमुखपद भूषविण्यास सत्यपालसिंह यांनी नकार दिला होता. तेव्हापासून भाजपमध्ये त्यांच्याबद्दल अनुकूल मत असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, राजकारणात प्रवेश करणार असल्याचे वृत्त निरर्थक असून असा कोणताही विचार केलेला नाही, असे सत्यपालसिंह यांनी सांगितले आहे.