आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळढोकसाठी ‘सेव्ह टायगर’सारखी मोहीम, रेडिओ टॅगिंगचा सरकारचा निर्णय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशभरात ग्रेट इंडियन बस्टार्ड म्हणजेच माळढोक या पक्ष्याची संख्या फक्त दोनशेच उरली आहे. या पक्ष्याचे एकेकाळचे नंदनवन असलेल्या महाराष्ट्रात तर केवळ वीसच माळढोक उरले आहेत. यामुळे महाराष्ट्राने आता माळढोकचे रेडिओ टॅगिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
‘वाघ वाचवा’ मोहिमेसाठीही रेडिओ टॅगिंगचीच पद्धत अवलंबण्यात आली होती. कारण राज्यात आता वाघांपेक्षाही माळढोकची संख्या घटलेली आहे. माळढोक हा पक्षी फक्त भारत आणि पाकिस्तानात आढळतो. 44 वर्षांपूर्वी म्हणजेच 1969 मध्ये त्यांची संख्या 1260 होती. देशात सर्वाधिक 100 माळढोक राजस्थानात आहेत. उर्वरित पक्षी गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक व उत्तर प्रदेशात आहेत.
शिकारीमुळे नव्हे तर अधिवास क्षेत्र घटल्यामुळे माळढोकची संख्या घटली आहे. निर्मनुष्य माळरान ही या पक्ष्याची आवडती जागा आहे. मात्र बेसुमार वृक्षतोड आणि मानवी अतिक्रमणांमुळे माळरानांचेच अस्तित्व धोक्यात आलेले आहे. या कारणांमुळे माळढोकचे प्रजनन घटले आहे. माळढोक पक्षी एप्रिल-सप्टेंबर काळात अवघे एक अंडे घालतो. मात्र अनेक राज्यांतील वृत्तांनुसार तेथे एकाही नवा पक्षी जन्मास आलेला नाही.
महाराष्ट्राने सोलापूरमधील पक्षी अभयारण्य फक्त माळढोकसाठीच राखीव केलेले असल्याची माहिती राज्याचे मुख्य वनसचिव प्रवीण परदेशी यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.