मुंबई- वरळीतील कॅम्पा कोलाप्रकरणी तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेली 31 मे पर्यंतची मुदत वाढवून मिळावी अशा आशयाची याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे या संकुलातील रहिवाशांना सुप्रीम कोर्टाने दिलासा नाही. आता या रहिवाशांना 31 मे पूर्वी आपली घरे खाली करावीच लागणार आहेत. त्यामुळे आगामी महिन्यात मुंबईत या प्रकरणी राजकीय व सामाजिक वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
कॅम्पा कोलाप्रकरणी रहिवाशांनी महानगरपालिका प्रशासनोसोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. तसेच याची मुदत 31 मे दिली होती. त्यानंतर पालिकेने पुन्हा रीतसर कायदेशीर कारवाई करावी असे आदेश दिले होते. मात्र, महापालिका प्रशासनाने या काळात काहीही केले नसल्याने घर खाली करण्याची मुदत आणखी वाढवून मिळावी अशी मागणीची याचिका पुन्हा दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी झाली मात्र कोर्टाने ती फेटाळून लावली आहे.
या संकुलातील रहिवाशांनी उपलब्ध एफएसआयनुसार काही मजले अधिकृत करण्याचा प्रस्ताव मुंबई पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांना दिला होता. मात्र आयुक्तांनी या प्रस्तावावर कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. तसेच मजले अधिकृत करण्यास ते उत्सुक नसल्याचे चित्र आहे. राज्य सरकारनेही या प्रकरणी बघ्याची भूमिका घेतल्याने कॅम्पा कोलावासिय चिंतित आहेत.
कोर्टाने दिलेली मुदत संपली आली असतानाही पालिका प्रशासन व सरकार कोणतीच भूमिका घेत नसल्याने रहिवाशांनी पुन्हा एकदा कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र कोर्टानेही त्यांना दिलासा दिला नाही. आता या संकुलात अनधिकृत घरात राहणा-या नागरिकांना 31 मे पूर्वी घर खाली करावी लागणार आहेत.