आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- स्कूल बसमधून प्रवास करणा-या विद्यार्थिनींची सुरक्षा संबंधित शाळेने केली पाहिजे. तशा सूचना सर्व शाळांना दिल्या जात असून लवकरच याबाबत धोरणात बदल करण्याचा विचार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाचे प्रधान सचिव जे. एच. सहारिया यांनी सोमवारी दिली. मुंबईतील जुहू येथील जमनाबाई नरसी शाळेतील चार वर्षांच्या विद्यार्थीनीचा स्कुल बस चालकाकडून विनयभंग झाल्याची घटना समोर आल्यामुळे आता राज्य सरकारने याबाबत गांभीर्याने दखल घेतली आहे.
राज्यातील बहूसंख्य विद्यार्थी बसद्वारेच शाळेत जातात. मुंबईतील चार वर्षाचा मुलीचा बसमध्येच विनयभंग झाल्याने आता स्कुलबसने जाणा-या विद्यार्थीनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या शाळांमध्ये स्वत:ची स्कु ल बस सेवा आहे तेथे बसमधून जाणा-या विद्यार्थ्यांची सर्व जबाबदारी ही संबंधित शाळेवर राहणार आहे. तर ज्या शाळांनी बस कंत्राटदार नियुक्त केले आहेत त्यांनी आपल्या कंत्राटात यासंदर्भातील बाबींचा अंतर्भाव केला पाहिजे. तशा सूचनाही सरकारतर्फे दिल्या जातील, असे सहारिया यांनी स्पष्ट केले.
शाळेने ही खबरदारी घ्यावी...
बस चालक मद्यपान करणारा आहे का, त्याचे वर्तन कसे आहे, त्याच्यावर काही गुन्ह्यांची नोंद आहे का, त्याचे छायाचित्र आणि पत्ता शाळेकडे नोंद आहे का याबाबींची शाळांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. तशा सूचना शाळांना दिल्या जातील, असे सहारिया यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सरकार पातळीवरही स्कूल बसच्या धोरणात बदल केला जाणार आहे. मात्र, शाळांच्या सोबतच मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी पालकांवरही असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.