मुंबई - सणांच्या कालावधीत राज्यातील शाळांमध्ये परीक्षा घेतल्या जात नाहीत. मात्र, आता यात पर्युषण पर्वाचाही समावेश शालेय शिक्षण विभागाने करीत तुघलकी कारभाराचा नमूना पेश केला आहे. पर्युषण काळात मुंबई आणि मीरा-भाईंदरमध्ये मांसबंदीचा निर्णय घेऊन भाजपवर टीका होत असतानाच आता शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या काळात परीक्षाही घेऊ नयेत, असा फतवा काढला आहे.
गणेशोत्सव, दिवाळी, नाताळ, ईद अशा धार्मिक सण आणि उत्सवादरम्यान शाळांना अल्प मुदतीच्या सुट्टयांचे नियोजन अथवा त्यामध्ये बदल करण्याचा निर्णय पालक-शिक्षक संघटनाच्या बैठकीत घेण्यात यावा असा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी प्रसिध्द केला. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ व शासनाचे प्रचलित आदेश, नियम, मार्गदर्शक सूचना यानुसार आवश्यक किमान शैक्षणिक दिवस शाळेचे कामकाज होईल या अटीच्या अधीन राहून निर्णय घेण्यात यावा असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. तसेच या अटीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता संबंधित जिल्ह्याचे प्राथमिक वा माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्यांनी घ्यायची आहे. या शासन आदेशात गणेशोत्सव, दिवाळी, नाताळ ईदबरोबरच आता पर्युषण पर्वाचाही समावेश करण्यात आलेला आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार इयत्ता पहिली ते पाचवीसाठी २०० कार्यदिन आणि प्रत्येक शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष अध्यापनाचे ८०० घड्याळी तास आणि सहावी ते आठवीसाठी २२० कार्यदिन आणि प्रत्येक शैक्षणिक वर्षात अध्यापनाचे १००० घड्याळी तास निश्चित करण्यात आलेले आहेत. तसेच शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील एकूण सुट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त देता येत नाहीत तसेच कामाचेही २३० दिवस होणे आवश्यक आहे. या नियमानुसार प्राथमिक वा माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्यांनी स्थानिक ठिकाणच्या गरजेनुसार शाळा व्यवस्थापन समिती अथवा पालक शिक्षक संघ यांच्या सहमतीनुसार व शिफारशीनुसार गणेशोत्सव, दिवाळी, पर्युषण पर्व, नाताळ, ईद आदी धार्मिक सणाच्या कालावधीत चाचणी परीक्षांचे शाळांमध्ये आयोजन करु नये असेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. प्राथमिक वा माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्यांनी या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या दीर्घकालीन अनुपस्थितीमुळे अन्य वेळी परीक्षा घेण्याबाबत नियोजन करावे व त्यानुसार सर्व शाळांना सूचना द्याव्यात असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
फक्त दोन दिवसांची बंदी
राज्य सरकारच्या २००४ च्या जीआरनुसार पर्युषण काळात मांस विक्री दोन दिवस बंद करण्यात येईल. पण, सरकारच्या जीआरचा मान न राखत भाजपचे नेते स्वत:ची मनमानी करत असतील तर शिवसेना खपवून घेणार नाही. मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त अच्युत हांगे यांच्या कानावर ही गोष्ट आम्ही घातली असून त्यांनी हा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. सत्तेचा फायदा घेऊन मांसहार करण्यांविरोधात हे ठरवून कारस्थान आहे. आठ दिवसांची बंदीचा निर्णय कायम ठेवल्यास आम्ही रस्त्यावर उतरल्यािशवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया घोडबंदर तसेच मीरा भाईंदर पूर्वचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. - प्रताप सरनाईक, शिवसेना आमदार
भाजप हा भारतीय जैन पक्ष
सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पक्ष हा सर्व धर्मीयांचा विचार न करता जैन, गुजराती व मारवाडी या ठराविक समाजाच्या पाठीमागे उभा राहताना दिसत आहे, ते चित्र लोकशाहीचा विचार करता योग्य नाही. हे सारे समाज उद्योगपतींशी निगडीत असल्याने सत्ताधारी त्यांच्याबाजूने झुकत आहे. भाजप हा भारतीय जैन पक्ष असल्याची जोरदार टीका मनसे गटनेते संदीप देशपांडे यांनी केली. - संदीप देशपांडे, मनसे गटनेते
गणेशोत्सव, दिवाळी, पर्युषण पर्व, नाताळ, ईद आदी धार्मिक सणाच्या कालावधीत चाचणी परीक्षांचे शाळांमध्ये आयोजन करू नये, असेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.