आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताशी युद्धाचे धाडस पाकिस्तान करणार नाही : अणुशास्त्रज्ञ अनिल आनंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारताकडे आण्विक पाणबुड्या असल्याने पाकिस्तान भारताविरुद्ध उघड युद्ध पुकारण्याचे धाडस दाखवू शकणार नाही, असा विश्वास ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि मुत्सद्दी अनिल आनंद यांनी व्यक्त केला. दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध अण्वस्त्र वापरणे म्हणजे शत्रूचा एक डोळा फोडण्यासाठी स्वत:चे दोन डोळे फोडून घेणे आहे, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी दोन्ही देशांना दिला.

‘आण्विक पाणबुडींचे महत्त्व’ या विषयावर मुंबई प्रेस क्लबतर्फे सोमवारी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. भारताच्या अणुऊर्जा आयोगातून संचालक पदावरून २००१ मध्ये निवृत्त झालेल्या आनंद यांनी आण्विक पाणबुड्यांशी संबंधित प्रकल्पाचे संचालकपदही भूषविले आहे. तसेच भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले.

भारताशी दोन उघड युद्ध लढलेल्या पाकिस्तानने भारताकडे आण्विक पाणबुड्या आल्यानंतर उघड युद्ध करण्याचे धाडस म्हणूनच दाखवलेले नाही,’ असे मत आनंद यांनी मांडले. संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थायी समितीचे ५ सदस्य देश वगळता अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र सज्ज आण्विक पाणबुडी विकसित करणारा सहावा देश भारत आहे. त्यामुळे आज पाकिस्तानलाही या पाणबुडीचा दरारा आहे.

‘ पाण्याच्या खूप खाली असलेल्या या पाणबुड्या नेमक्या कुठे आहेत हे उपग्रहाच्या माध्यमातूनही शोधता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करता येत नाही. या उलट त्या वेगात जाऊन शत्रूंवर अचूक हल्ला करू शकतात. पाकिस्तानने आपल्या दोन शहरांवर अण्वस्त्रे टाकण्याचे ठरवले तर त्यांच्यापूर्वी आपल्या पाणबुड्या त्यांच्या शहरांजवळ जाऊन धडकतील आणि अण्वस्त्र हल्लाही करतील,’ अशा शब्दांत त्यांनी भारताच्या पाणबुड्यांचे सामर्थ्य त्यांनी विशद केले.

भारत अण्वस्त्रसज्ज आहे म्हणून पाकिस्तानशी युद्ध करणे किंवा पाकिस्तानने भारताशी युद्ध करून अण्वस्त्रे वापरणे म्हणजे शत्रूचा एक डोळा फोडण्यासाठी स्वत:चे दोन डोळे फोडून घेण्यासारखे होईल,’ असा सबुरीचा सल्लाही त्यांनी दोन्ही देशांना दिला. भारत-पाक यांच्यात तणाव असला तरी तो युद्धापर्यंत ताणला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

निर्बंध असताना तंत्रज्ञान विकसित
१९८४ पासून या पाणबुड्याच्या विकास कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी यास गती दिली. आपल्यावर निर्बंध असतानाही आपण तंत्रज्ञान विकसित केले. कलपक्कम येथे आपला पहिला प्रकल्प स्थापन करण्यात आला आणि येथेच देशाची अण्वस्त्र सज्ज, क्षेपणास्त्र हल्ला करण्याची क्षमता असलेले आणि अणुऊर्जेवर चालणारी अरिहंत नामक आण्विक पाणबुडी तयार करण्यात आली. या पाणबुड्यांमध्ये नियमित आण्विक इंधन भरण्याचा प्रकल्पही भारतात असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...