मुंबई- आबालवृद्धांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्क्रीनची संगत अपरिहार्य ठरू लागली आहे. हा मानवी प्रगतीचा नवा टप्पा असला तरीही यात आरोग्याशी निगडित अनेक धोके दडलेले आहेत. त्यातला एक मोठा आणि कायम दुर्लक्षिला धोका नेत्रविकारांसंबंधी असून, बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवलेल्या “मायोपिया’ या विकारामुळे लहान मुलांची दृष्टी अधू होत असल्याचे चिंताजनक वास्तव “इंडिया व्हिजन इन्स्टिट्यूट’चे व्यवस्थापकीय संचालक अाणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनाेद डॅनियल यांनी “दिव्य मराठी’शी संवाद साधताना बोलून दाखवले.
सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील ब्रायन हाेल्डन व्हिजन इन्स्टिट्यूट अाणि हैदराबादच्या एल.व्ही. प्रसाद अाय इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्यातून इंडिया व्हिजन इन्स्टिट्यूट ही स्वयंसेवी संस्था ५ वर्षांपासून नेत्रविकारांबाबत जनजागृती करत अाहे. शहरी व ग्रामीण भागातील वंचितांच्या नेत्रविकारांची चिकित्सा करून ही संस्था चष्मे उपलब्ध करून देते. संस्थेचा ७० टक्के भर मुलांच्या डाेळे तपासणीवर अाहे. ‘मायाेपिया’ या विकाराने बऱ्याचदा मुलांना लांबवरचे वाचता येत नाही. मुख्यत्वे शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये ही समस्या आढळते. भारतात याचे प्रमाण ७ टक्के असले तरी चीनसारख्या देशात ते ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे संस्थेचे निरीक्षण आहे.
वयाची चाळिशी अाेलांडल्यानंतर वाचनक्रियेवर परिणाम होतो. कामाची उत्पादकता जवळपास ४० टक्क्यांनी घटते. परंतु, याबद्दल जनतेमध्ये पुरेसे गांभीर्य अद्याप निर्माण झालेले नाही. असेही विनोद डॅनियल यांनी सांगितले.
सूर्यप्रकाशाच्या अभावाने नेत्रविकार
इलेक्ट्राॅनिक्स गॅजेट्सचा अतिवापर, मैदानी खेळ न खेळणे अादींबरोबरच नैसर्गिक सूर्यप्रकाश न मिळणे ही लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या नेत्रविकारांमागील प्रमुख कारणे आहेत. यामुळे अंधत्व येते असे नाही, मात्र दूरचे स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे वेळीच नेत्र तज्ज्ञांकडे जाऊन डाेळे तपासणी करणे गरजेचे अाहे, असे आग्रही मत डॅनियल यांनी या वेळी व्यक्त केले. संस्थेने महाराष्ट्रासह अन्य दहा राज्यांतील सुमारे १,१४,५४५ गरीब रुग्णांना सेवा पुरवली आहे. मात्र, आजही देशातल्या १० काेटी लोकांकडे नेत्रविकाराची माहिती घेऊन चष्मे मिळण्यासाठी काेणतेही साधन उपलब्ध नाही. ग्रामीण भागांत केवळ ४० हजार नेत्र तज्ज्ञ उपलब्ध असल्याने डाेळे तपासणी करण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. अशा प्रसंगी अाणखी किमान १ लाख २० हजार नेत्रतज्ज्ञांची नितांत गरज असल्याचे निरीक्षण डॅनियल यांनी नोंदवले आहे.