आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Second Day Assembly Adourned Due To Ajit Pawar's Comment

अजित पवारांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून दुस-या दिवशीही विधानसभेचे कामकाज तहकूब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवरून विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणि निंदाव्यंजक ठरावाचा वापर करून चर्चा घडवून आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न मंगळवारी निष्फळ ठरला. मात्र पवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असणा-या विरोधकांच्या गोंधळाला राष्ट्रवादी आमदारांनीही प्रत्त्युत्तर दिले. त्यामुळे गोंधळ वाढला व विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.


सकाळी प्रश्नोत्तरांच्या तासाला सुरुवात झाली, तेव्हाच विरोधकांनी पवारांच्या विधानांवर स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा घ्यावी, अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे म्हणाले की, पवार यांच्या विधानांनी दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. त्यांच्याकडून महिलांचाही अपमान झाला आहे. त्यामुळे स्थगन प्रस्तावाद्वारे यावर चर्चा घ्यावी. तसेच, मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावे, अशी मागणीही केली; परंतु हा प्रस्ताव निकषांत बसत नसल्याचे सांगत वळसे यांनी परवानगी नाकारली. त्यावरून विरोधकांनी पुन्हा गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने कामकाज स्थगित करण्यात आले. नंतर आमदार जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, विलास लांडे आदी राष्ट्रवादी आमदारांनी देखील पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी गोंधळ अधिक वाढला व दिवसभरासाठी कामकाज तहकूब झाले.


विधान परिषद दुस-या दिवशीही तहकूब
बेताल वक्तव्यावर सभागृहात चर्चा व्हावी आणि अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विरोधक मंगळवारीही आक्रमक राहिले. त्यामुळे प्रथम दोन वेळा अर्ध्या तासासाठी आणि नंतर दिवसभरासाठी विधान परिषदेचे कामकाज तहकूब करण्यात आले. विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेवर चर्चेची मागणी करतानाच पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली. तेव्हा उपसभापती वसंत डावखरे यांनी सभापतींनी चर्चेला परवानगी दिली नसल्याचे सांगितले; परंतु विरोधक आग्रही राहिले तेव्हा राष्ट्रवादीच्या सदस्यांनीही आक्रमकता दाखवत पवारांचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. वाढता गदारोळ पाहून डावखरे यांनी कामकाज तहकूब केले. कामकाज सुरू झाल्यानंतरही विरोधकांनी घोषणाबाजी केली, त्यात सत्ताधारीही सहभागी झाल्याने गोंधळ वाढला व कामकाज तहकूब झाले.


मेटे, पंडितांकडून विरोध
विधान परिषदेत शेवटच्या टप्प्यात तावडे यांनी परत राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर राष्‍ट्रवादीचे सदस्य विनायक मेटे, अमरसिंह पंडित, हेमंत टकले, जयंत जाधव, किरण पावसकर यांनी तावडेंच्या मागणीला आक्षेप घेतला. या गदारोळामुळे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.


उपोषणकर्ते देशमुखांची ‘वर्षा’वर धडक
उजनी धरणात पाणी सोडण्यासाठी 65 दिवसांपासून उपोषणास बसलेले सोलापूरचे प्रभाकर देशमुख यांच्यासह काही शेतक-यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. मुख्यमंत्री घरी नसल्यामुळे देशमुख यांना प्रवेश देण्यात आला नाही, त्यांना ताब्यात घेण्यात आले नाही, असे पोलिस उपायुक्त निसार तांबोळी यांनी सांगितले.


दादांच्या चुकीसाठी कार्यकर्त्यांचे प्रायश्चित्त
‘दादांच्या चांगल्या कामांचे श्रेय आम्ही घेतो, मग त्यांच्या चुकांचे प्रायश्चित्तसुद्धा करणार’, असे सांगत जळगावच्या राष्‍ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनतेसमोर नतमस्तक होत माफीनामा जाहीर केला आहे. राष्‍ट्रवादीचे प्रदेश सचिव विनोद देशमुख यांनी सांगितले की, अजितदादा यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत अनेक चांगली कामे केली आहेत. त्यांच्या चांगल्या कामांप्रमाणे चुकीतही आम्ही स्वत:ला सहभागी समजत आहोत.